Ketan Agarwal : लोहगडवरील ‘अपघाती मृत्यू’ नव्हे, तर नियोजित खून; होणाऱ्या पत्नीसह प्रियकर अटकेत
Ketan Agarwal : लोहगड किल्ल्यावरून पाय घसरून दरीत पडल्यामुळे मृत्यू झाल्याचे समजल्या गेलेल्या २५ वर्षीय केतन विशाल अगरवाल प्रकरणाला अत्यंत धक्कादायक वळण मिळाले आहे.

Ketan Agarwal : लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झाल्याचे समजल्या गेलेल्या २५ वर्षीय केतन विशाल अगरवाल यांच्या मृत्यू प्रकरणाने धक्कादायक वळण घेतले आहे. हा अपघात नसून होणाऱ्या पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने रचलेल्या कटातून झालेला खून असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी केतनची होणारी पत्नी सिया प्रविण गोयल (वय २०) आणि तिचा प्रियकर चेतन बाबुलाल चौधरी (वय २२) यांना अटक केली आहे. (Ketan Agarwal)
१८ जून रोजी लोहगड किल्ल्याच्या पश्चिम बाजूला झुडपांमध्ये केतन अगरवाल यांचा मृतदेह आढळला होता. त्यावेळी सिया गोयल हिने किल्ला फिरत असताना केतनचा पाय घसरून तो दरीत कोसळल्याची माहिती दिली होती. त्यानुसार लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. (Ketan Agarwal)
मात्र, पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान सिया गोयल हिचे चेतन चौधरी याच्याशी प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली. सियाचे लग्न केतनशी ठरले होते, मात्र तिला ते लग्न करायचे नव्हते. त्यामुळे दोघांनी मिळून केतनचा काटा काढण्याचा कट रचल्याचे उघड झाले. (Ketan Agarwal)
पोलिसांच्या माहितीनुसार, सिया गोयल हिने केतनला फिरण्यासाठी लोहगड किल्ल्यावर नेले. त्याचवेळी प्रियकर चेतन चौधरीलाही गुपचूप तेथे बोलावण्यात आले. संधी साधून दोघांनी मिळून केतनला किल्ल्यावरून ढकलून दिले, ज्यात त्याचा मृत्यू झाला. (Ketan Agarwal)
केतनचे वडील विशाल देवीचंद अगरवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३ आणि ६१(२) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत. (Ketan Agarwal)






