Katraj Kondhwa Road: जूनची मुदतही हुकली! आता कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी दिली ‘ही’ नवी डेडलाइन
Katraj Kondhwa Road: महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचा जूनअखेर रस्ता खुला करण्याचा दावा फोल; पावसाळ्यात रस्त्याची झाली दुरवस्था.

Katraj Kondhwa Road – कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाबाबत महापालिका प्रशासनाने दिलेले आणखी एक आश्वासन हवेत विरल्याचे स्पष्ट झाले आहे. या रस्त्याचे भूसंपादनाचे काम मेअखेर पूर्ण होईल, तसेच जूनअखेर प्रत्यक्ष रस्त्याचे काम पूर्ण करून नागरिकांसाठी मार्ग खुला करण्यात येईल, असा दावा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी मार्च महिन्यात अंदाजपत्रक सादर केल्यानंतर केला होता. मात्र, जुलैचा मध्य उलटूनही काही मिळकतींचे भूसंपादन रखडले असून,
ताब्यात आलेल्या जागांवरही रस्त्याचे काम अर्धवटच आहे. त्यातच पावसाळ्यात या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. आता प्रशासनाने जूनऐवजी थेट मार्च महिन्यापर्यंतची नवी मुदत जाहीर केली आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे वाहतूक कोंडी, धूळ, खड्डे आणि संथ कामाचा त्रास सहन करणाऱ्या नागरिकांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडली आहे.
यापूर्वी दिलेल्या मुदती का पाळल्या गेल्या नाहीत, याचे कोणतेही समाधानकारक उत्तर प्रशासनाकडे नसल्याने नागरिकांचा महापालिकेवरील विश्वास उडू लागला आहे. शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या कात्रज ते खडी मशिन चौक या सुमारे साडेतीन कि.मी.च्या रस्त्याचे रुंदीकरण २०१७ मध्ये सुरू झाले. सुरुवातीला ८४ मीटर रुंदीचा रस्ता करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, भूसंपादनातील अडथळे, नियोजनातील त्रुटी आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे प्रकल्प वर्षानुवर्षे रखडला. अखेर महापालिकेला ८४ मीटरऐवजी पहिल्या टप्प्यात ५० मीटर रुंदीकरण करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
भूसंपादनही अर्धवटच
या टप्प्यासाठी आवश्यक १०९ मिळकतींपैकी ८४ मिळकती ताब्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला असला, तरी उर्वरित २५ मिळकतींचे भूसंपादन अद्याप पूर्ण झालेले नाही. टीडीआर आणि एफएसआयद्वारे भूसंपादन करताना आलेल्या तांत्रिक अडचणी, जागामालकांची रोख मोबदल्याची मागणी आणि धोरणातील बदल यामुळे प्रकल्पाची गती वारंवार मंदावली. आता एप्रिलपासून भूसंपादनाला वेग आल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात रस्त्यावरील कामाची गती नागरिकांना दिसत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.





