Pune Airport: पुणे विमानतळावर प्रवाशांसाठी ‘गुड न्यूज’! जुन्या टर्मिनलचे रूपडे पालटले, गर्दीपासून मिळणार मुक्ती
Pune Airport: लोहगाव विमानतळाच्या जुन्या टर्मिनलचे ४,०७५ चौरस मीटरमध्ये अत्याधुनिक नूतनीकरण पूर्ण; चेक-इन काऊंटर आणि सुरक्षा यंत्रणेत मोठी वाढ.

Pune Airport – लोहगाव येथील पुणे विमानतळावरील प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी जुन्या टर्मिनल इमारतीचे ४ हजार ७५ चौरस मीटर क्षेत्रात अत्याधुनिक नूतनीकरण पूर्ण झाले. याठिकाणी १४ चेक-इन काउंटर, अत्याधुनिक सुरक्षा मशिन्स आणि डिजी यात्रा सुविधा असून, फायर एनओसी आणि ओआरटी चाचण्या यशस्वी झाल्यानंतर,
आता केवळ ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी (बीसीएएस) च्या अंतिम मंजुरीनंतर हे टर्मिनल पुणेकरांच्या सेवेत दाखल होईल, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. लोहगाव येथील जुन्या टर्मिनल इमारतीच्या नूतनीकरणाची पाहणी केल्यानंतर मोहोळ म्हणाले, की या प्रकल्पाच्या कार्यान्वयनाच्या दृष्टीने ९ मे २०२६ रोजी राज्य अग्निशमन विभागाकडून फायर एनओसी मिळवली होती.
त्यानंतर २२ जुलै रोजी ऑपरेशनल रेडीनेस अँड एअरपोर्ट ट्रान्सफर (ओआरएटी) सराव यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला. दि. ३० आणि ३१ जुलै रोजी अंतिम सुरक्षा तपासणीही पार पडली आहे. या सुविधेमुळे पुणे विमानतळाची प्रवासी हाताळणी क्षमता प्रतितास सुमारे ४०५ प्रवाशांनी वाढणार असून,
चेक-इन आणि सिक्युरिटी प्रक्रियेदरम्यान होणारी गर्दी पूर्णपणे कमी होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पाच्या बहुतांश तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्या असून, आता केवळ ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीची अंतिम परवानगी मिळणे बाकी आहे. ही मंजुरी मिळताच नवे टर्मिनल पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.
टर्मिनलची ठळक वैशिष्ट्ये
– चेक-इन भागात तीन आणि सुरक्षा तपासणी क्षेत्रात ४ नव्या एक्सबीआयएस मशिन्स
– ८ डीएफएमडी यंत्रणा
– बोर्डिंगसाठी ६ ए आणि ६ बी अशी दोन नवीन बोर्डिंग गेट्स
– प्री-एसएचए क्षेत्र आणि बोर्डिंग गेट्सवर बायोमेट्रिक डिजी यात्रा सुविधा
– ६६.४० चौरस मीटरचे रिटेल आउटलेट्स आणि सुसज्ज फूड कोर्ट
– लहान मुलांसाठी डायपर चेंजिंग स्टेशन, वॉशरूम






