Katraj Kondhwa Road : कात्रज-कोंढवा रस्त्यास वेग! भूसंपादनाचा मोठा टप्पा पूर्ण; रखडलेल्या उड्डाणपुलाचं काम अखेर सुरू
Katraj Kondhwa Road : एनएचएआयच्या प्रकल्पासाठी आवश्यक जागेचा अडथळा दूर; महापौर मंजुषा नागपुरे आणि आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडून कामाचा थेट आढावा.

Katraj Kondhwa Road – कात्रज चौक ते पिसोळीदरम्यानच्या ५० मीटर विकास योजना रस्त्यासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेला गती मिळाली असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) कात्रज उड्डाणपूल प्रकल्पासाठी आवश्यक जागेचा ताबा महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे रखडलेल्या उड्डाण पुलाचे काम वेगाने सुरू झाले असून, या कामाची पाहणी महापौर मंजुषा नागपुरे तसेच महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केली.
यावेळी आमदार योगेश टिळेकर, सभागृह नेते गणेश बिडकर, प्रभाग समिती अध्यक्षा रंजना टिळेकर, नगरसेविका अर्चना जगताप, पूजा कदम, अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, पथ विभागाचे अधीक्षक अभियंता अजित बांबळे, भूसंपादन अधिकारी श्वेता दारुणकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. कात्रज-कोंढवा परिसरातील भूसंपादन सुरू असलेल्या ठिकाणी महापौर आणि आयुक्तांनी शुक्रवारी प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला.
मौजे कात्रज आणि मौजे कोंढवा परिसरातील ८४ मीटर विकास आराखडा रस्त्यापैकी ५० मीटर रस्त्यासाठी शासनामार्फत भूसंपादन प्रक्रिया सुरू होती. विशेष भूसंपादन अधिकारी क्रमांक १५ यांनी २७ एप्रिल २०२६ रोजी सुमारे ४१ हजार चौरस मीटर क्षेत्राचा निवाडा जाहीर केला आहे. या भूसंपादनासाठी महापालिकेने सुमारे १९७ कोटी रुपये शासनाकडे जमा केले आहेत.
निवाड्यानंतर पंधरा दिवसांची नोटीस देऊन १४ मेपासून प्रत्यक्ष ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. दोन दिवसांत १०९ मिळकतींपैकी ४८ मिळकती ताब्यात घेण्यात आल्या असून, जवळपास २५ हजार चौरस मीटर क्षेत्र महापालिकेच्या ताब्यात आले आहे. एनएचएआयच्या उड्डाणपुलासाठी आवश्यक जागेचा ताबा मिळाल्यानंतर पथ विभागामार्फत त्या ठिकाणी प्रत्यक्ष कामालाही सुरुवात करण्यात आली आहे.
पाण्याच्या टाक्यांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
महंमदवाडी -उंड्री आणि एनआयबीएम परिसरातील नागरिकांच्या पाणी समस्येवर दिलासा देणाऱ्या चोवीस तास पाणीपुरवठा प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या नव्या पाण्याच्या टाक्यांचे लोकार्पण रविवारी (दि. १७) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा महापौर मंजुषा नागपुरे यांनी शुक्रवारी घेतला.
उंड्री येथील दोराबजी मॉलजवळील घुले चौक येथे दुपारी १ वाजता हा लोकार्पण सोहळा होणार आहे. या प्रकल्पामुळे उंड्री आणि परिसरातील पाणीपुरवठा अधिक नियमित, सक्षम आणि दाबाने होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.






