धक्कादायक ! घाटकोपरनंतर आता कल्याणमध्ये कोसळले महाकाय होर्डिंग

कल्याण : मुंबईतल्या घाटकोपरमधील पेट्रोलपंपवर 16 मे रोजी होर्डिंग पडल्याची घटना घडली होती. यामध्ये जवळजवळ 16 जणांचा मृत्यू झाला होता तर 75 जण जखमी झाले होते. ही घटना ताजी असताना आता कल्याणमध्ये होर्डिंग कोसळण्याची मोठी दुर्घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
काय घडले नेमके?
कल्याण सदानंद चौकात हे भलेमोठे होर्डिंग कोसळले आहे. या चौकात नेहमी लोकांची मोठ्या प्रमाणात रहदारी असते. तसेच गाड्यादेखील मोठ्या संख्येने असतात. या पडलेल्या होर्डिंगखाली दहा ते बारा दुचाकी दबल्या गेल्या. तसेच एक चारचाकी कारदेखील या होर्डिंगखाली अडकली. सुदैवाने चारचाकीतील चालक होर्डिंग पडण्याच्या काहीवेळ आधीच गाडीतून बाहेर पडला होता.गाडीवर होल्डिंग पडल्याने कारचे नुकसान झाले आहे. तसेच रस्त्यावरचं होर्डिंग पडल्याने रस्त्यात ट्रॅफीक झाले आहे. या घटनेमध्ये दोन नागरिक जखमी झाल्याचे समजत आहे.
मुंबईप्रमाणे कल्याणमधील होर्डिंगदेखील अधिकृत आहेत की अनधिकृत आहेत? हे सांगता येणं कठीण आहे. पण यात सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. ही दुर्घटना कशी झाली? यात किती गाड्यांचे नुकसान झाले याचा पंचनामा करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.





