Maharashtra Accident : कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील रायते येथील नव्या पुलावर आज सकाळी भीषण अपघात झाला. ओम्नी प्रवासी गाडी आणि मिक्सर यांच्यात झालेल्या समोरासमोर धडकेत तब्बल ११ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. (Maharashtra Accident) मिळालेल्या माहितीनुसार, मुरबाड येथून कल्याण कडे जाणारी ओम्नी गाडी रायते परिसरातील पुलावरून जात असताना समोरून येणाऱ्या मिक्सरला जोरदार धडकली. ओव्हरटेक करताना चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तीन मुलींसह एकूण ११ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महसूल विभागातील एका कर्मचाऱ्याचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Maharashtra Accident) घटनेची माहिती मिळताच कल्याण तालुका पोलीस आणि टिटवाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य राबवण्यात आले. कल्याणजवळील रायते पुलावर झालेल्या भीषण अपघातात ११ प्रवाशांनी आपला जीव गमावला आहे. या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे : प्रशांत चेदणे, भूषण घोरपडे, अनंता पवार, दीपक गवळी, नेहा मोहपे, मानसी मोहपे, प्रथमेश मोहपे, जिजागा केमबारी, गणपती मदे आणि इतर. दरम्यान, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त करत निवेदन जारी केले. प्राथमिक माहितीनुसार, ओम्नी वाहनाची क्षमता ५+१ असताना त्यामध्ये ११ प्रवासी प्रवास करत होते, ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत पुलाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. घाईघाईत पूल सुरू केल्यामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. (Maharashtra Accident)