चिंबळीतील के. टी. बंधारा धोक्यात; ग्रामस्थांची प्रशासनाकडे तातडीने दुरुस्तीची मागणी

चिंबळी : खेड तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील चिंबळी, कुरूळी, मोई, केळगाव आणि मरकळ परिसरात गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आठ ते दहा दिवस उघडीप दिली होती. यामुळे शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीची कामे आणि सोयाबीन पिकाची खुरपणी सुरू केली होती. मात्र, गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाने पुन्हा जोर धरल्याने शेतीची कामे रखडली असून खुरपणीची कामेही बंद पडली आहेत.
मावळ परिसरात सतत पडणाऱ्या पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. यामुळे नदीतील जलपर्णी वाहून गेली असली, तरी मोशी-चिंबळी हद्दीवरील इंद्रायणी नदीवरील महाराष्ट्र शासनाने बांधलेल्या के. टी. बंधाऱ्याला राडारोडा अडकला आहे. यामुळे बंधारा धोकादायक बनण्याची भीती स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंना असलेले सिमेंटचे गड्डे तुटल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे.





