Pune District : ‘सिद्धबेट’चे काम केळगाव ग्रामपंचायतीस द्यावे

चिंबळी : सिद्ध बेट देवस्थान केळगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत असल्याने येथील स्वच्छता व विकासासाठी ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांच्या ताब्यात राहावे, यासाठी गांवकऱ्यांच्या उपस्थितीत बैठक नुकतीच पार पडली. यात हा निर्णय घेण्यात आल्याचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य किरण मुंगसे यांनी सांगितले.
केळगाव ग्रामपंचायतच्या वतीने विशेष ग्रामसभा आयोजित करून सिद्धबेट या पवित्र स्थानाच्या चुकीच्या हस्तांतरणासंदर्भात ज्ञानेश्वर महाराज संस्थान यांच्या वतीने चुकीच्या पद्धतीने बातम्या देऊन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. सिद्ध बेट केळगाव हद्दीत असल्याने सिद्ध बेट हे देखभाल दुरुस्तीसाठी शासनाने केळगाव ग्रामपंचायतीस द्यावे, या मागण्यांसाठी ही विशेष ग्रामसभा बोलवण्यात आली होती. त्यानिमित्ताने अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
गावाने त्या विरोधात एकमताने ठराव मंजूर केला असून शासन जर चुकीच्या पद्धतीने हस्तांतरण दुसऱ्या कुठल्याही संस्थेला देणार असेल तर ते येणाऱ्या काळात आंदोलन उभारले जाईल. शासनाचा निषेध केला जाईल, कुठल्याही परिस्थितीत या सिद्ध बेट ठिकाणचा ताबा कोणालाही घेऊ देणार नाही.
आळंदी देवस्थानच्या, तसेच शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार आग्रही असून, विविध कामांसाठी मागील सहा महिन्यांत अनेक माध्यमातून निधी दिला आहे. इद्रांयणी तीरावर भाविकांना सुसज्ज आणि स्वच्छ घाट असावा, यासाठी देवस्थान घ्या वतीने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
शिंदे यांनी तातडीने घाट कामासाठी निधी मंजूर केला. फडणवीस यांनीही आळंदीतील सिध्दबेट आळंदी देवस्थानकडे देखभाल दुरुस्ती तसेच विकासासाठी वर्ग केला आहे.अशी माहिती एका वृत्तपत्रात प्रसिद्ध करुन ते आळंदी देवस्थानकडे मिळाले आहे. हे आळंदी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त चैतन्य महाराज कबीर, विश्वस्त आळंदी देवस्थान यांच्याकडून मिळालेली माहिती ही वृत्तपत्रात चुकीच्या पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आली. हे लक्षात आल्यानंतर केळगाव ग्रामस्थांनी आज बैठक घेऊन सर्वानुमते ठराव मंजूर केला.





