K. Annamalai : आंदोलकांशी चर्चेला उशीर का? अन्नामलाई यांचा भाजपवर जोरदार निशाणा
भाजपचे माजी नेते आणि वी द लीडर्स या चळवळीचे प्रमुख के. अन्नामलाई (K. Annamalai) यांनी बुधवारी नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

K. Annamalai : भाजपचे माजी नेते आणि वी द लीडर्स या चळवळीचे प्रमुख के. अन्नामलाई (K. Annamalai) यांनी बुधवारी नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. गेल्या काही वर्षांत नीटची प्रश्नपत्रिका तीन वेळा लीक होऊनही प्रशासनाची कोणतीही जबाबदारी निश्चित करण्यात आली नाही, असा आरोप करत यामुळेच विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावे लागले, असे ते म्हणाले.
लोकशाहीत आंदोलन करणे हा मूलभूत अधिकार आहे. तरीही केंद्र सरकारने आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी एवढा वेळ का लावला? परिस्थिती हाताबाहेर जाईपर्यंत अर्थपूर्ण चर्चा का टाळली गेली, असा सवाल त्यांनी (K. Annamalai) उपस्थित केला. अन्नामलाई म्हणाले की, मी नेहमीच वैयक्तिक पातळीवर नीट परीक्षेचे समर्थन केले आहे, कारण यामुळे देशभरात एकसमानता येते आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची संधी मिळते.
मात्र, गेल्या ५ वर्षांत ३ वेळा प्रश्नपत्रिका लीक झाल्या आहेत. वारंवार पेपर लीक झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागली, ज्यामुळे त्यांच्यावर प्रचंड मानसिक ताण आला. व्यवस्थेतील उत्तरदायित्वाच्या अभावामुळेच विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास (K. Annamalai) झाला आणि त्यांना रस्त्यावर उतरावे लागले.जर आपल्या देशातील तरुण पिढीचा शिक्षण व्यवस्थेच्या पारदर्शकतेवरील विश्वास उडाला, तर आपण राष्ट्राचे भविष्य धोक्यात घालत आहोत.
केंद्राला पारदर्शकता दाखवून लवकरात लवकर योग्य पावले उचलण्याचे आवाहन करतानाच, अन्नामलाई यांनी आंदोलक विद्यार्थ्यांनाही सतर्क राहण्याचा सल्ला दिला.ते म्हणाले की, जेव्हा एखादे आंदोलन अनेक आठवडे चालते, तेव्हा काही हितसंबंधी घटक स्वतःचा अजेंडा राबवण्यासाठी व्यासपीठाचा गैरवापर करण्याचा प्रयत्न करतात. विद्यार्थ्यांचे मूळ मुद्दे भरकटू नयेत यासाठी त्यांनी अशा घटकांपासून सावध राहावे आणि आपल्या मुख्य मागण्यांवर ठाम राहावे, असे आवाहन त्यांनी (K. Annamalai) केले.






