Sunil Jakhar : आप सरकारकडून नोकरशाहीचा गैरवापर; पंजाब भाजप अध्यक्ष सुनील जाखड यांचा आरोप
पंजाबमधील नुकत्याच पार पडलेल्या महापौर आणि नगरपरिषद अध्यक्षांच्या निवडणुकीदरम्यान आम आदमी पक्षाच्या सरकारने नोकरशाहीचा गैरवापर करून लोकशाही प्रक्रियेला धक्का पोहोचवला असल्याचा थेट आरोप पंजाब भाजप अध्यक्ष सुनील जाखड (Sunil Jakhar) यांनी बुधवारी केला.

Sunil Jakhar : पंजाबमधील नुकत्याच पार पडलेल्या महापौर आणि नगरपरिषद अध्यक्षांच्या निवडणुकीदरम्यान आम आदमी पक्षाच्या सरकारने नोकरशाहीचा गैरवापर करून लोकशाही प्रक्रियेला धक्का पोहोचवला असल्याचा थेट आरोप पंजाब भाजप अध्यक्ष सुनील जाखड (Sunil Jakhar) यांनी बुधवारी केला.
सुनील जाखड (Sunil Jakhar) यांनी स्पष्ट केले की, लोकशाहीत नोकरशाहीचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असून महसूल व प्रशासकीय यंत्रणेने संविधानाच्या चौकटीत राहून काम करणे अपेक्षित असते. परंतु, राज्य सरकारच्या दबावाखाली येऊन सरकारी अधिकाऱ्यांनी आपले स्वातंत्र्य आणि विवेक गमावला आहे. जनतेची सेवा करण्याऐवजी अधिकाऱ्यांना सरकारच्या दबावाखाली काम करावे लागत आहे, असा घणाघात त्यांनी केला.
अशा परिस्थितीत सामान्य नागरिकांनी न्यायासाठी कुठे जायचे? असा सवाल जाखड (Sunil Jakhar) यांनी उपस्थित केला. अबोहर महानगरपालिका आणि फाजिल्का नगरपरिषद निवडणुकीत भाजपला मिळालेल्या विजयाचे श्रेय जाखड यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि तेथील स्थानिक जनतेला दिले. जाखड यांनी आरोप केला की, जनतेचा पाठिंबा गमावलेले आप सरकार राजकारणात गुन्हेगारी घटकांना पुढे आणून मतदारांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे.
हे राजकारणाचे वाढते गुन्हेगारीकरण चिंताजनक आहे. नोकरशाहीचे राजकीयीकरण आणि राजकारणातील गुन्हेगारीकरणामुळे पंजाब पुन्हा एका काळ्या आणि कठीण कालखंडात ढकलला जाऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला. नोकरशाही एका भ्रष्ट सरकारसमोर शरणागत झाली आहे, असा दावा करत जाखड (Sunil Jakhar) म्हणाले की, सरकारचा कोणताही लोकशाहीविरोधी किंवा पंजाबविरोधी डाव भाजप यशस्वी होऊ देणार नाही.






