Thackeray Brothers : राजकीय वर्तुळात भूकंप! ठाकरे बंधू पुन्हा एकत्र; मुंबईत ‘या’ दिवशी धडकणार महामोर्चा
मराठी भाषेच्या मुद्द्यानंतर आता विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि भविष्यासाठी ठाकरे बंधू (Thackeray Brothers) पुन्हा एकदा एकत्र रस्त्यावर उतरणार आहेत.

Thackeray Brothers : मराठी भाषेच्या मुद्द्यानंतर आता विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि भविष्यासाठी ठाकरे बंधू (Thackeray Brothers) पुन्हा एकदा एकत्र रस्त्यावर उतरणार आहेत. २६ तारखेला मुंबईत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्या वतीने महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संयुक्त मोर्चाची (Thackeray Brothers) अधिकृत भूमिका आणि रूपरेषा स्पष्ट करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या सकाळी पत्रकार परिषद घेणार असून, संपूर्ण राज्याचे लक्ष या घडामोडींकडे लागले आहे.
नेमकी काय आहे पार्श्वभूमी?
दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत ठाकरे बंधूंनी थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
देशाचे शिक्षणमंत्री राजीनामा देत नाहीत, आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला जात आहे आणि या गंभीर विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह मौन बाळगून आहेत, असा आरोप करत ठाकरे बंधूंनी या केंद्र सरकारच्या कारभाराविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. २६ तारखेच्या संयुक्त मोर्च्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काय भूमिका मांडतात, याविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे आंदोलकांच्या भेटीला
संयुक्त मोर्चाची घोषणा होण्यापूर्वी आज मनसे नेते अमित ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे (Thackeray Brothers) यांनी मुंबईतील शिवतीर्थावर जमलेल्या आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना आदित्य ठाकरे म्हणाले “ही एकत्र आलेली ताकद युवकांची आहे. आपण सगळे अशा प्रकारे एकत्र आलो आहोत हे खूप महत्त्वाचे आहे. इथे कोणी राजकीय पक्षाचे आहे का? कोणी अर्बन नक्षलवादी किंवा दहशतवादी आहे का? इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येक हिंदुस्तानी नागरिकाने ‘वंदे मातरम्’ आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणा द्याव्यात, हीच आपली खरी ताकद आहे.” तसेच, दिल्लीतील परिस्थितीचा संदर्भ देत त्यांनी मुंबई पोलिसांचे आभार मानले.
“आज मी आणि अमित वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आलो, तिथेही असेच तरुण-तरुणी जमले होते. एक गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल की, दिल्लीत जसा प्रकार घडला, तसा मुंबई पोलिसांनी केलेला नाही. त्यांनी कोणालाही हात लावलेला नाही, त्यामुळे आपण प्रशासनाचे आभार मानले पाहिजेत,” असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.






