Ganesh Visarjan Pune : उत्सवाच्या रंगात सामाजिक भान! गणेश विसर्जनाच्या मार्गावर आकर्षक रांगोळी; तरुणांना व्यसनमुक्तीचा संदेश
Ganesh Visarjan Pune : दरवर्षीप्रमाणे यंदाही मिरवणुकीच्या मार्गावर विविध आकर्षक देखावे आणि सजावट करण्यात आली आहे. हे देखावे पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.

पुणे : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पुणेकर आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी सज्ज झाले आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांवर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून, ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे.
पुण्यातील मानाचे पाचही गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाले असून, त्यांच्या मिरवणुकीला भाविकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. मानाच्या पाच गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला पुण्याच्या गणेशोत्सवात विशेष महत्त्व आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मिरवणुकीच्या मार्गावर विविध आकर्षक देखावे आणि सजावट करण्यात आली आहे. हे देखावे पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.
दरम्यान, विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्याही साकारण्यात आल्या आहेत. या रांगोळ्यांच्या माध्यमातून विविध सामाजिक आणि जनजागृतीपर संदेश देण्यात येत आहेत. नागनाथ पार येथे ‘अभिनव कलाकृती’ यांच्या वतीने साकारण्यात आलेली एक रांगोळी नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.
या रांगोळीच्या माध्यमातून तरुणांना व्यसनांपासून दूर राहण्याचा संदेश देण्यात आला आहे. व्यसनामुळे शरीरावर होणारे घातक परिणाम कलात्मक पद्धतीने या रांगोळीतून दाखवण्यात आले आहेत. व्यसनाधीनतेमुळे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम अधोरेखित करत तरुणांनी व्यसनांपासून सावध राहावे, असा संदेश या कलाकृतीतून देण्यात आला आहे.
गणेशोत्सवासारख्या मोठ्या सार्वजनिक उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर जनजागृतीमुळे कौतुक होत आहे. त्यामुळे गणरायाच्या विसर्जनाच्या उत्साहासोबतच सामाजिक संदेश देणाऱ्या या रांगोळीचीही चर्चा होत आहे.



