NCP Merger : राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत मोठी अपडेट; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवारांना निर्णयासाठी मुदत?
NCP Merger : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणासाठी भाजप आग्रही असल्याची माहिती आहे. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याशी चर्चा सुरू असून निर्णयासाठी मुदत दिल्याची चर्चा आहे.

NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चांना आता वेग आला आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे विलिनीकरण व्हावे, यासाठी भाजप आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याशी भाजपकडून चर्चा सुरू असून, त्यांना निर्णय घेण्यासाठी मुदत देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, अशी भाजपची भूमिका असल्याचे सांगितले जात आहे. भाजपकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याशी चर्चा सुरू असतानाच शरद पवार गटाशी जवळीक वाढवण्याचेही प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.
सुनेत्रा, पार्थ पवारांचा विलिनीकरणाला विरोध?
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी भाजप आग्रही असले, तरी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचा या निर्णयाला विरोध असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीतील मंत्री आणि आमदार विलिनीकरणाच्या बाजूने असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
मागील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासोबत विलिनीकरणाच्या मुद्द्यावर बैठक झाल्याची माहिती आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडूनही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना लवकर निर्णय घेण्याची मुदत देण्यात आल्याचीही चर्चा आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर चर्चांना वेग
अजित पवारांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अजित पवारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्षाचे चिन्ह त्यांच्या गटाकडे गेले होते. त्यामुळे पक्षावर त्यांचेच वर्चस्व होते. दुसरीकडे, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची धुरा सांभाळत आहेत.
अजित पवारांनंतर राष्ट्रवादीची सूत्रे कोणाच्या हाती जाणार, हा प्रश्न सध्या महत्त्वाचा ठरला आहे. त्यांच्या कुटुंबात पक्षाचे नेतृत्व करण्याचा दीर्घ राजकीय अनुभव असलेला चेहरा नसल्याने दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला आहे.





