Junnar News: ३५१ फुटी तिरंग्याने जुन्नर शहर दुमदुमले! देशप्रेमाच्या जयघोषाने नागरिक भारावले
Junnar News: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे जुन्नर शहरात ३५१ फुटी भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन; हजारो विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग.

Junnar News – स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर तसेच भारतीय सुरक्षा दलांच्या सन्मानार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जुन्नर शहराच्या वतीने 351 फुटी भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेत जुन्नर शहरातील युवक, विद्यार्थी, माजी सैनिक, राष्ट्रप्रेमी नागरिक तसेच सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रनिर्माणाचा संदेश दिला.
‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी जुन्नर शहराचा परिसर दुमदुमून गेला. हातात 351 फुटी तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या युवकांनी भारतीय ध्वजाबद्दलचा अभिमान व्यक्त केला. आजच्या युवा पिढीसमोर विविध माध्यमांतून नकारात्मक विचारांचे वातावरण निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर युवकांच्या ऊर्जेला सकारात्मक दिशा मिळावी, त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी,
सकारात्मक विचार आणि देशसेवेची भावना निर्माण व्हावी, तसेच देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्य करणार्या सुरक्षा दलांप्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी, या उद्देशाने तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेत शंकरराव बुट्टे महाविद्यालय, श्री शिवछत्रपती महाविद्यालय, प्रज्ञान करिअर अकॅडमी, लक्ष करिअर अकॅडमी, श्री छत्रपती शिवाजी महाराज पोलीस भरती अकॅडमी यांसह विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
शहरातील विविध राष्ट्रप्रेमी संघटना, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते आणि नागरिकांनीही यात्रेत सहभाग घेतला. यात्रेदरम्यान माजी सैनिक संघ, जुन्नरच्या माजी सैनिकांचा विद्यार्थ्यांना विशेष सहवास लाभला. देशाच्या रक्षणासाठी आयुष्यातील महत्त्वाचा काळ समर्पित करणार्या माजी सैनिकांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह निर्माण झाला.
माजी सैनिक उमेश अवचट यांनी विद्यार्थ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि त्यासोबतची जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले. संविधानाने दिलेल्या या अधिकाराचा वापर जबाबदारीने व विधायक पद्धतीने केला पाहिजे. युवकांनी आपल्या विचारांचा उपयोग सामाजिक प्रबोधन, सकारात्मक परिवर्तन आणि राष्ट्रनिर्माणासाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले.





