Jos Buttler Record : जोस बटलरने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये प्रस्थापित केला षटकारांचा नवा विक्रम
Jos Buttler Record : गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्ससमोर २११ धावांचे लक्ष्य ठेवले. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गुजरातने २० षटकांत चार गडी गमावून २१० धावा केल्या.

Jos Buttler 600 T20 Sixes Record : आयपीएल २०२६ च्या १४ व्या सामन्यात गुजरात टायटन्स (GT) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यातील लढतीत इंग्लंडच्या जोस बटलरने आपल्या बॅटने दिल्लीच्या मैदानात इतिहास रचला आहे. अरुण जेटली स्टेडियमवर बटलरने आपल्या ५२ धावांच्या तुफानी खेळीदरम्यान टी-२० क्रिकेटमधील एका अशा शिखराला गवसणी घातली, जिथे आजवर कोणताही इंग्लिश खेळाडू पोहोचू शकला नव्हता.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या गुजरात टायटन्सची सुरुवात खराब झाली होती. तिसऱ्याच षटकात साई सुदर्शन बाद झाल्यानंतर जोस बटलरने डावाची सूत्रे हाती घेतली. त्याने केवळ २७ चेंडूंत ३ चौकार आणि ५ उत्तुंग षटकारांच्या मदतीने ५२ धावा कुटल्या. या खेळीतील पहिल्या षटकारासह त्याने ॲलेक्स हेल्सला मागे टाकले आणि पाचवा षटकार ठोकताच टी-२० कारकिर्दीतील ६०० षटकार पूर्ण केले.
जगातील पाचवा ‘सिक्सर किंग’ –
JOS THE BOOS IS BACK !🤟
1st fifty of the season in just 27 balls !#JosButtler #gtvsrr #cricmantrana pic.twitter.com/RYiBuYp7NA— CRICMANTRANA (@cricmantrana) April 8, 2026
टी-२० क्रिकेटमध्ये ६०० किंवा त्यापेक्षा जास्त षटकार मारणारा जोस बटलर हा जगातील केवळ पाचवा फलंदाज ठरला आहे. विशेष म्हणजे, या यादीतील पहिले चारही खेळाडू वेस्ट इंडिजचे आहेत. बटलरने आतापर्यंत ४९६ सामन्यांत ६०० षटकार आणि १३,९६१ धावा केल्या आहेत.
टी-२० मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू:
- ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) – १०५६ षटकार
- कायरन पोलार्ड (वेस्ट इंडिज) – ९८२ षटकार
- आंद्रे रसेल (वेस्ट इंडिज) – ७८४ षटकार
- निकोलस पूरन (वेस्ट इंडिज) – ७१२ षटकार
- जोस बटलर (इंग्लंड) – ६०० षटकार
१४,००० धावांचा टप्पा खुणावतोय –
सहाशे षटकारांनंतर बटलर आता एका आणखी मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे. टी-२० क्रिकेटमध्ये १४,००० धावा पूर्ण करण्यासाठी त्याला आता केवळ ३९ धावांची गरज आहे. हा टप्पा गाठणारा तो जगातील पाचवा आणि इंग्लंडचा दुसरा फलंदाज ठरेल. ख्रिस गेल, पोलार्ड, ॲलेक्स हेल्स आणि डेव्हिड वॉर्नर यांनीच आजवर हा पराक्रम केला आहे. बटलरचा सध्याचा फॉर्म पाहता पुढच्याच सामन्यात तो हा मैलाचा दगड पार करेल, अशी दाट शक्यता आहे.





