Maharashtra Politics : विलीनीकरणावर चर्चा झाली? शरद पवारांसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं? बड्या नेत्याने स्पष्टपणे सांगितलं…
Maharashtra Politics : शरद पवार यांना काल रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर पक्षातील अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेतली. जितेंद्र आव्हाड यांनीही शरद पवारांची भेट घेतली.

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून यांसदर्भात प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विलीकरणाच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
शरद पवार यांना काल रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर पक्षातील अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेतली. जितेंद्र आव्हाड यांनीही शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांचे स्पष्ट शब्दांत खंडन केले. शरद पवार यांच्यासोबत झालेल्या भेटीत विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
जितेंद्र आव्हाड म्हणाले ‘आमच्यामध्ये विलीनीकरणाची कोणतीही चर्चा झाली नाही. मला तर त्यात काही रसही नाही. मला त्यामध्ये घेण्यात येणार नसेल, तर अशा चर्चांचा प्रश्नच येत नाही,’ असे आव्हाड यांनी बोलताना स्पष्ट केले. साहेबांसोबत गप्पा मारण्यासाठी बसलो आणि त्यानंतर वेगवेगळे विषय निघत गेले, असेही त्यांनी सांगितले.
एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची भेट आणि दुसरीकडे विलीनीकरणाच्या चर्चांचे आव्हाडांकडून खंडन करण्यात आल्याने दोन्ही राष्ट्रवादीच्या गोठात नेमकं काय सुरू आहे याविषयी तर्क वितर्क लावले जात आहेत. त्यामुळे आता आगामी काही दिवसांत नेमक्या कोणत्या घडामोडी विलीनकरणाच्या अनुषंगाने घडणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
शरद पवारांसोबत ३ तास बैठक?
शरद पवार यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर पक्षातील अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यात काल दुपारी बैठक झाली. या बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली याविषयीचा तपशील समोर आलेला नाही. याशिवाय शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबतही ३ तास बैठक झाली. याविषयी सांगताना खासदार अमोल कोल्हे यांनी पवारांची तब्येत चांगली असल्याचे म्हणत दिवाळीनिमित्ताने गप्पा रंगल्याचे सांगितले.





