Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आज बैठक पार पडली. या बैठकीत नव्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा करण्यात आली आहे. सध्या या पदावर जयंत पाटील होते. पाटील यांनी राजीनामा दिला असून आता या पदावर शशिकांत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. शिंदे यांची निवड ही एकमताने करण्यात आली. शिंदे हे शरद पवारांचे विश्वासू नेते मानले जातात. त्यामुळे त्यांना ही संधी मिळाल्याची चर्चा आहे. मावळते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर शशिकांत शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. दरम्यान, यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी, माझ्या खाद्यांवर झेंडा येईल असे वाटले नव्हते. पण तसे झाले. मला पक्षाचे अध्यक्षपद सात वर्ष सांभाळता आले. या सात वर्षांत अनेकांनी मला साथ दिली. पक्ष फुटलेला होता. मेहबूब शेख सारखा पोरगा तरूणाचे प्रतिनिधीत्व करतो. सक्षणाला युवतीची अध्यक्ष झाली. सुनिल गव्हाण विद्यार्थ्यांचा प्रमुख झाला. रूपाली चाकणकर त्यावेळी महिला अध्यक्ष झाल्या. सामान्य घरातील मुलांना साहेबांनी पदं दिली. आरआर पाटील (आबा) यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केले. तेच चित्र पुढे ठेऊन आज या सगळ्यांच्या नेमणुका झाल्या. सगळ्या राज्यात जागर निर्माण करण्याचे काम दोन अमोलांनी केले. एक अमोल कोल्हे आणि दुसरे अमोल मिटकरी. पण आज एक इकडे आहे दुसरे तिकडे गेलेत. माझी कोणती संघटना नाही की माझे दुसरे कुठले फाऊंडेशन. माझी राष्ट्रवादी हीच संघटना असून हेच फाऊंडेशन आहे. त्याचेच फळ मला मिळाले असून मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष झालो. गेली 25 वर्ष मी काम करत आहे. 2633 दिवस मी प्रदेशाध्यक्ष राहिलो. इतरांची 2 ते 3 वर्षांची टर्म असते. मात्र साहेबांनी मला वारंवार संधी दिल्याचे जयंत पाटील म्हणाले. शरद पवार साहेबांनी मला सांगितले, तूच अध्यक्ष व्हायला हवं. आता बरीच वर्ष झाली मीच अध्यक्ष आहे. आता मला बाजूला व्हायला पाहिजे याची जाणीव झाली आणि मी बाजूला झालो. मी कमी बोलतो. त्यामुळे लोकांना वाटतं मी. पण माझ्या विरोधात अनेक कुरघोड्या झाल्या. प्रत्येक गोष्टीत प्रसार माध्यमांबरोबर बोललेच पाहीजे असे मला वाटत नाही. माझे सगळे सहकारी गेले आणि मीच फक्त साहेबांबरोबर राहिल्याचेही त्यांनी सांगिलतं. दरम्यान जयंत पाटील यांनी, मी बायकोला परवा म्हणालो की गेल्या सात वर्षात आपण सुट्टी काढली नाही. मात्र या सात वर्षात ज्यांनी साथ दिली, त्यांचे आभार तर आता जे कोणी नवे अध्यक्ष होतील त्यांना शुभेच्छा देतो. आपला पक्ष सर्व समावेश आहे. ओबीसी घटकाला आपल्या पक्षाशी जोडण्याचे काम केले पाहीजे. जातीय संघटनांमध्ये कमी रहा. पक्षाचा विचार पुढे ठेवा. मला विश्वास आहे आपण नक्की यश्वस्वी होऊ, असाही कानमंत्र त्यांनी दिला. कोण आहेत शशिकांत शिंदे? शशिकांत शिंदे हे मूळचे जावळी तालुक्यातील हुमगाव येथील रहिवासी आहेत. ते वाणिज्य शाखेचे पदवीधर असून माथाडी कामगारांचे प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1963 रोजी झाला. वडील जयवंतराव शिंदे आणि आई कौसल्या शिंदे यांच्या सुसंस्कृत आणि प्रेमळ वातावरणात त्यांचे बालपण गेले. – लहान वयातच समाजकारण आणि राजकारणात ते सक्रिय. – 1999 साली प्रथम जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. – महाराष्ट्र राज्याच्या कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळाचे जलसंपदामंत्री म्हणून काम पाहिले आहे. – 2009 ते 2014 या कालावधीत त्यांनी कोरेगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून काम केले. – दोन पंचवार्षिक जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार – दोन पंचवार्षिक कालावधीसाठी कोरेगावचे आमदारही होते. – 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव महेश शिंदे यांनी केला. – सातारा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून भाजपच्या महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. – यानंतर विधानसभा निवडणुकीत कोरेगाव मतदारसंघातून महेश शिंदेंविरोधात त्यांचा पराभव झाला होता. – सध्या शशिकांत शिंदे हे विधान परिषद आमदार आणि शरद पवार गटाचे मुख्य प्रतोद आहेत. आता त्यांची राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. – शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांसोबत आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतरही त्यांनी शरद पवारांची साथ दिली.