Satara : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापनदिन पुण्यात होणार साजरा

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा २६ वा वर्धापन दिन १० जून रोजी पुण्यात साजरा होणार आहे. गेल्या २६ वर्षाच्या स्थापना काळात पक्षाचा वर्धापनदिन पहिल्यांदाच पुण्यात होणार असल्याची माहिती शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.
यावेळी ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार जयदेव गायकवाड, माजी शहराध्यक्ष रवींद्र माळवदकर, माजी महापौर अंकुश काकडे, श्रीकांत पाटील, विशाल तांबे, औदुंबर खुने पाटील, उदय महाले, किशोर कांबळे आदी उपस्थित होते.
या वर्धापनदिनाच्या निमित्ताने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदींच्या उपस्थितीत हा मेळावा होणार आहे. त्यांच्याच उपस्थितीत वर्धापनदिनी १० जून रोजी सकाळी १०.१० वाजता शिवाजीनगर येथील पक्ष कार्यालयात ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर सकाळी १०.३० ते १.१० यादरम्यान बालगंधर्व रंगमंदिर येथे पक्षाचा मेळावा होणार आहे, असे जगताप यांनी सांगितले.
२६ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच पुणे शहराला वर्धापन दिनाच्या यजमान पदाचा मान मिळाला आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात साजरा होत असलेला हा वर्धापन दिन पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देणारा, पक्षाला ताकद देणारा ठरेल, असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला.





