Shashikant Shinde : प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदेंची वर्णी? काय आहे शरद पवारांची नवी खेळी?

मुंबई : आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी (Shashikant Shinde) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात संघटनात्मक बदल होणार असल्याचे संकेत स्वतः शरद पवार यांनी एका कार्यक्रमात दिले होते. याची सुरुवात आता थेट प्रदेशाध्यक्षपदापासून झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री आणि वरिष्ठ नेते जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी आता शरद पवारांच्या तालमीत तयार झालेल्या, तितक्याच ताकदीच्या,अनुभवी आणि राजकारणाच्या मुशीत कसलेल्या शशिकांत शिंदेंची (Shashikant Shinde) वर्णी लागणार असल्याचे समजत आहे.
प्रदेशाध्यक्ष पदासाठी ‘या’ नेत्यांच्या नावाची चर्चा
गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा होती. पण त्यांच्या राजीनाम्यानंतर या पदावर कोणाची वर्णी लागणार? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. या पदासाठी रोहित पवार, राजेश टोपे,अनिल देशमुख,जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक नेत्यांची नावे आघाडीवर होती मात्र शरद पवारांनी या नेत्यांच्या नावाला बगल देत शशिकांत शिंदेंचे नाव पुढे आणले. त्यांनी शशिकांत शिंदेंचे नाव सुचवण्यामागे साहजिकच पुढील काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थातंर्गत महापालिका,जिल्हा परिषदा,पंचायत समिती,नगर पंचायती निवडणुकांचा पूर्ण विचार केला असणार. त्यामुळे शशिकांत शिंदेच (Shashikant Shinde) का? काय आहेत त्यांच्या जमेच्या बाजू…
पक्षफुटीच्या काळात पक्षासोबत एकनिष्ठ
अजित पवारांनी काही आमदारांना सोबत घेऊन पक्षातून बंड केले. त्यामुळे एकीकडे विश्वासू नेत्यांनी साथ सोडल्यानंतर शशिकांत शिंदेंनी शरद पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत किल्ला लढवला.एक एक सहकारी पवारांना सोडून जात असताना शिंदेंनी सातारा जिल्ह्याचा गड अभेद्य ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
साहेब आणि पक्ष जी जबाबदारी देतील ती पेलण्याची तयारी
शशिकांत शिंदेंनी शरद पवारांची राष्ट्रवादी पक्ष अडचणीत असताना किंवा पक्षाच्या अडचणीच्या काळात फक्त साथच दिली नाही,तर पक्ष किंवा साहेब देतील ती जबाबदारी त्यांनी अगदी सक्षमपणे पार पाडली. याच स्वभावामुळे शरद पवारांनी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा शिंदेंकडे सोपवण्यासाठी हिरवा कंदील दिला असल्याचे बोलले जात आहे.
कार्यकर्त्यांशी मोठा संपर्क
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मु्द्दा वादळी ठरण्याची शक्यता असताना शरद पवारांनी मराठा आरक्षणाबाबत कायम सकारात्मक भूमिका घेतलेल्या शिंदेंना प्रदेशाध्यक्षपदाची संधी दिली आहे. पक्षाच्या पाठबळामुळे त्यांनी माथाडी कामगारांना न्याय मिळवून दिला.नवी मुंबई आणि मुंबई परिसरात शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांचे मोठं नेटवर्क उभे केले आहे. ही शशिकांत शिंदेची बाकी नेत्यांपेक्षा जमेची बाजू आहे.
संघटनात्मक जबाबदार्यांचा दांडगा अनुभव
शशिकांत शिंदेंनी राजकीय क्षेत्रात वाटचाल करतानाच सामाजिक चळवळीतलं लक्ष कमी होऊ दिलं नाही. त्यांनी महाराष्ट्र राज्य माथाडी,ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचं सचिवपद, महाराष्ट्र राज्य माथाडी,ट्रान्सपोर्ट आणि जनरल मजदूर संघांचं अध्यक्षपद, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचं संचालकपद, राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार यूनियन अध्यक्षपद, महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे कामगार संघाचं अध्यक्षपद यांसारख्या विविध जबाबदार्याही त्यांनी राजकारणात असताना सांभाळल्या आहेत. शरद पवारांनी त्यांच्यातील नेमकी हीच बाब हेरली असणार…
राजकारणाचा अनुभव
शशिकांत शिंदेंनी जावळी विधानसभा मतदारसंघातुन २ वेळा आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघातुन २ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या महेश शिंदे (शिंदे गट) यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. तसेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे यांच्याविरोधात पराभव पत्करावा लागला होता. यानंतर शरद पवारांनी त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना विधानपरिषदेवर संधी दिली.
‘जायंट किलर’
शशिकांत शिंदेंनी जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी जनता दरबार सुरू करून सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणातील महत्त्वाचा मोहरा व संघर्ष योद्धा म्हणून त्यांची ओळख आहे. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी कोरेगाव मतदारसंघातून तत्कालीन आमदार शालिनीताई पाटील यांचा पराभव करत ‘जायंट किलर’ ठरले होते.
उदयनराजेंविरोधात दिली टफ फाईट
लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी अचानकपणे भाजपच्या उदयनराजेंविरोधात निवडणूक लढवण्याचे आदेश दिल्यानंतर साहेबांचा आदेशाचं पालन करताना कुठलेही आढेवेढे न घेता त्यांनी तयारी सुरु केली. एव्हाना उदयनराजेंसारखा ताकदवान ज्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते राज्यातील सत्ताधारी महायुतीनं पूर्ण ताकद पणाला लावली होती,त्यांच्याविरोधात शशिकांत शिंदेनी टफ फाईट दिली. शिंदेंना या निवडणुकीत तुतारी आणि पिपाणी या चिन्हांमधील घोळामुळे फटका बसला असल्याचे बोलले जात आहे. अवघ्या 32 हजार 771 मतांनी शशिकांत शिंदेंना पराभव पत्करावा लागला होता.
शरद पवारांनी नेतृत्व हेरले
शरद पवार यांच्याशी जवळून संपर्क आल्यानंतर त्यांनी पक्षसंघटनेत काम करण्यास सुरवात केली. माथाडी कामगारांच्या प्रश्नांमुळे त्यांची पक्ष कार्यालयाकडे आणि नेत्यांकडे वर्दळ वाढली. त्यांच्यातील नेतृत्व गुणांची चुणूक शरद पवार यांनी पाहिल्यानंतर त्यांचा जीव या तरुण नेतृत्वावर जडला. पक्षाने टाकलेला विश्वास आणि सोपविलेली जबाबदारी त्यांनी नीटनेटकी पार पाडली.
कार्यकर्त्यांना न्याय
शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केल्यावर त्यांनी कोणताही पुढचा मागचा विचार न करता पक्षात उडी घेतली आणि थेट साहेबांना मला कोणतीही जबाबदारी द्या, मी ती प्रामाणिकपणे पार पाडेन, अशी ग्वाही दिली. साहेबांनी पक्ष संघटना बळकट करण्याचे आणि वाढविण्याचे आदेश दिले आणि त्यांनी ती जबाबदारी अगदी लीलया पार पाडली.
साताऱ्याचे जिल्हाध्यक्षपद निभावले
जावळी आणि मुंबईत दहा वर्षांत केलेल्या चांगल्या कामगिरीच्या पाठबळामुळे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्यावर सातारा जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेतला. पक्षाचे जिल्हाध्यक्ष हे खुले आव्हान म्हणून स्वीकारलेल्या आमदार शशिकांत शिंदे यांनी मग जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या संस्थांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्याखाली आणण्यास सुरवात केली. तत्कालीन पालकमंत्र्यांशी समन्वय ठेवत जिल्ह्यातील प्रत्येक गावात पक्षसंघटना वाढवण्यावर भर दिला. सातारा जिल्ह्यातील अगदी गावपातळीवरील दूध सोसायटी,विकास सोसायटी,ग्रामपंचायतींवर पक्षाचा झेंडा फडकवला. जिल्ह्यामधील पंचायत समित्यांदेखील पक्षाच्या विचारांच्या कार्यकर्त्यांकडे सोपविल्या आणि जिल्हा परिषदेमध्ये पक्षाची सत्ता आणण्यात मोलाची भूमिका पार पाडली.
कार्यकर्त्यांमध्ये वेगळा संदेश जाणार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणातील महत्त्वाचा मोहरा व संघर्ष योद्धा म्हणून ओळख असलेल्या शशिकांत शिंदेंच्या रुपानं एक अनुभवी, मुत्सद्दी, कार्यकर्त्यांशी थेट कनेक्ट,सामाजिक संघटनांचं नेतृत्व केलेल्या नेत्याला पवारांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसवलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा संदेश जाण्याची शक्यता आहे.





