पिंपरी | जनसंवाद सभेला मिळाले मुख्य समन्वय अधिकारी

पिंपळे गुरव, (वार्ताहर) – महापालिकेच्या कासारवाडी ह क्षेत्रीय कार्यालयात सोमवारी जनसंवाद सभा पार पडली. लोकसभा निवडणूक, आचारसंहिता पार पडल्यानंतर सुरू झालेल्या जनसंवाद सभेत ह क्षेत्रीय कार्यालयाच्या जनसंवाद सभेला मुख्य समन्वयक उपस्िथत नव्हते. याबाबत दैनिक प्रभातने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर अखेर जनसंवाद सभेला मुख्य समन्वय अधिकारी मिळाले आहेत.
वृत्ताची दखल घेत महापालिकेच्या आयुक्तांकडून कासारवाडी येथील ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या जनसंवाद सभेसाठी मुख्य समन्वय अधिकारी म्हूणन उपायुक्त निलेश भदाणे यांची नियुक्ती करण्यात आली. अखेर सोमवारी पार पडलेल्या जनसंवाद सभेत नव्याने नियुक्ती झालेले उपायुक्त निलेश भदाणे यांनी मुख्य समन्वय अधिकारी म्हणून काम पाहिले.
सोमवारी सकाळ पासूनच ढगाळ वातावरण आणि सतत सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे प्रभागातील नागरिकांनी जनसंवाद सभेकडे पाठ फिरविली. केवळ चारच तक्रारी दाखल झाल्या. यामध्ये वल्लभनगर, कासारवाडी, सांगवी, पिंपळे गुरव मधील उद्यान, सीसीटीव्ही कॅमेरे आदी तक्रारींचे निरसन मुख्य समन्वय अधिकारी यांनी संबंधित विभागाशी चर्चा करून केले.
यावेळी क्षेत्रीय अधिकारी उमेश ढाकणे, कार्यकारी अभियंता स्थापत्य सतीश वाघमारे, उपअभियंता विद्युत संदीप जाधव, सहाय्यक आरोग्य विभाग अंकुश झिटे, उपअभियंता पाणीपुरवठा चंद्रकांत मोरे, कनिष्ठ अभियंता अतिक्रमण संदीप हजारे, उपअभियंता सुनील दांगडे, जयकुमार गुजर, प्रशांत कोतकर, चंद्रकांत मुठाळ, महेंद्र देवरे, शाम भंडारी जनसंवाद सभेत उपस्थित होते.





