पिंपरी | भर पावसाळ्यात रस्ते खोदाई ; आयुक्तांच्या आदेशाला हरताळ

पिंपळे गुरव, (वार्ताहर) – पावसाळ्यात रस्ते खोदाई करण्यास महापालिका आयुक्तांनी बंद घातली आहे. मात्र, आयुक्तांचे आदेश धुडकावत सर्रासपणे ह क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत स्थापत्य विभागाकडून ऐन पावसाळ्यात रस्ते खोदाई करण्यात आली आहे.
नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरात अशी जलनिस्सारण वाहीनी टाकण्याचे काम गेल्या तीन आठवड्यापासून सुरू आहे. त्यामुळे आयुक्तांच्या आदेशालाच हरताळ फासल्याचे दिसून येत आहे.
नवी सांगवी येथील क्रांती चौकातील बोरा हॉस्पिटल रस्ता, त्रिमूर्ती कॉलनी येथे रस्त्याचे खोदकाम सुरू आहे. बोरा हॉस्पिटलचा रस्त्याचे अंतर साडेचारशे मीटर असून त्रिमूर्ती कॉलनीचा रस्ता साडे तीनशे मीटरचा आहे. मात्र, ऐन पावसाळ्यात खोदकाम सुरू केल्याने स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. संपूर्ण रस्त्याची खोदाई केल्याने संपूर्ण रस्ताच चिखलमय झाला आहे.
त्रिमूर्ती कॉलनी येथील रस्त्याचे खोदकाम करून वाहिनी टाकून झाली आहे. येथील खोदकाम केलेले खड्डे बुजविण्यात आले आहेत. मात्र, मुसळधार पाउस झाल्यास रस्त्यात खड्डे की खड्ड्यात पाणी अशी गत निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील रस्त्याचे काम सध्या तरी ठप्पच आहे. टप्प्या टप्प्यावर जलनिस्सारण वाहिनीचे बांधकाम करून खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजविण्यात आले आहे.
या खोदकामात अनेकांचे नळ कनेक्शनची पाइलाइन तुटत आहे. तर कुणाचे ड्रेनेजला जोडण्यात आलेली पाईपलाईन, महावितरणची केबल तुटून पडत आहे. याचा नाहक नागरिकांना सहन करावा लागत आहे. गेली काही दिवस नागरिकांची वाहने मुख्य रस्त्यावर रस्त्याच्या कडेला पदपथाला लागून पार्क करावी लागत आहेत. ज्येष्ठांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.
आयुक्तांची विशेष परवानगी घेऊनच येथील दोन्ही रस्त्याचे खोदकाम सुरू केले आहे. पाऊसामुळे काम अंदाज घेत सुरू आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत येथील दोन्ही रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. स्थानिक नागरिकांच्या आग्रहा खातर रस्त्याचे काम सुरू केले आहे. – जयकुमार गुजर, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य विभाग.





