पिंपरी | दापोडीकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार

पिंपळे गुरव, (वार्ताहर) – पिंपळे गुरव ते दापोडीला जोडणाऱ्या पुलावरील जलवाहिनीचे काम बुधवारी (दि. ३१) सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होते. यावेळी दापोडी परिसरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला.
अशी माहिती महापालिका पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता चंद्रकांत मोरे, कनिष्ठ अभियंता राहुल पाटील, संदीप ढेपले यांनी दिली. या जलवाहिनीचे काम झाल्याने दापोडीकरांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. असा विश्वास माजी नगरसदस्य व महापालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
बुधवारी सकाळपासूनच पुलावर कामकाज सुरु होते. त्यासाठी सांगवी वाहतूक पोलिसांच्या मदतीने पुलावरील एक बाजूची वाहतूक गरजेनुसार बंद करण्यात आली होती. यावेळी सुमारे २० वर्षांपूर्वीची जीर्ण झालेली जलवाहिनी काढून टाकण्यात आली.
त्याचप्रमाणे गळती होत असलेले जुने व्हॉल्व्ह, पंप नव्याने टाकण्यात आले. पुलावरील ग्रॅव्हीटी पाइपलाइनसाठी २५ जुलै रोजी दापोडी गावाकरिता शटडाऊन घेतला होता.
त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तसेच भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्व सूचनेनुसार २४ व २५ जुलै रोजी पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यामुळे शटडाऊन स्थगित केला होता. त्यामुळे हे कामकाज बुधवारी दापोडी गावचा पाणीपुरवठा बंद ठेऊन करण्यात आले.
पाणीपुरवठा राहणार खंडित
दुरुस्तीच्या कामासाठी दापोडी परिसरातील सर्व पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवल्यामुळे सर्व भागात गुरुवारी १ ऑगस्ट रोजी होणारा सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होईल, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
दापोडी परिसराला बऱ्याच दिवसांपासून पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे. दापोडी हा शेवटचा भाग असल्याने पाणीपुरवठ्याचा दाब वाढवावा तसेच नवीन जलवाहिनी टाकण्यात यावी, यासाठी महापालिकेला निवेदन देऊन पाठपुरावा सुरु होता.
या मागणीची महापालिकेने दखल घेतल्याने दापोडीतील लाइनचे काम पुर्ण झाले. ही आनंदाचीच बाब आहे. या नवीन टाकलेल्या जलवाहिनीमुळे लोकांना योग्य दाबाने व पुरेसे पाणी मिळणार आहे. – स्वाती काटे, माजी नगरसेविका
दापोडीत थोड्याच नागरिकांना पाणीपुरवठ्याची समस्या होती. परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नवीन जलवाहिनीचे काम करण्यात आले. ही लाईन वळविण्यात आलेली नाही, आहे त्या लाइनला ती बदलण्यात आली. त्यामुळे पाण्याचा प्रेशरही चांगल्या प्रकारे मिळणार आहे. – चंद्रकांत मोरे, उप अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका.





