Pimpri : जनतेच्या प्रश्नांकडे महापालिकेचे दुर्लक्ष!

पिंपळे गुरव : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालयात सोमवारी (दि. १४) झालेल्या जनसंवाद सभेला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अनुपस्थित राहून नागरिकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. तब्बल तीन आठवड्यांनंतर पार पडलेल्या या सभेला क्षेत्रीय अधिकारी आणि मुख्य समन्वय अधिकारी अनुपस्थित राहिल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटला.
जनसंवाद सभेच्या ठिकाणी उपस्थित अधिकाऱ्यांनी, “मुख्य अधिकारी अत्यंत तातडीच्या बैठकीसाठी गेले आहेत,” अशी माहिती दिली. मात्र, आयुक्तांच्या स्पष्ट आदेशानुसार जनसंवाद सभेस सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी हजर राहणे बंधनकारक असूनही वरिष्ठ अधिकारी परवानगीशिवाय इतर बैठकीस गेल्याचा आरोप नागरिकांनी केला.
सभेस केवळ मोजके अधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांवर जसे की, ड्रेनेज तुंबणे, झाडांची छाटणी, अतिक्रमण, खड्डे, कचरा, पाणीपुरवठा आणि आरोग्य यासंबंधी १६ तक्रारी सादर केल्या. हे तक्रारींचे संख्याबळ मागील सर्व जनसंवाद सभांपेक्षा जास्त होते.
तक्रार निवारणाची अपेक्षा घेऊन आलेले नागरिक मात्र संबंधित विभागांचे अधिकारी गैरहजर असल्यामुळे निराश होऊन बाहेर पडले. उपअभियंता रवींद्र सूर्यवंशी यांनी काही तक्रारींचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला, परंतु संपूर्ण विभागीय समन्वयाचा अभाव स्पष्ट जाणवत होता.
महिन्यातून दोनच वेळा होणाऱ्या जनसंवाद सभेला वरिष्ठ अधिकारी गैरहजर राहतात, तर नागरिकांनी आपली समस्या कुणासमोर मांडावी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नागरिकांचे प्रश्न ‘तातडीचे’ नसून अधिकारी वर्गासाठी ‘जनतेची बैठकी’ गौणच असल्याचे या प्रकारावरून स्पष्ट होते.
सोमवारी जनसंवाद सभा सुरू असताना ड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत शनिवारी पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री हिंजवडी येथे येणार असल्याने अतिक्रमण विभागाने डांगे चौक, लक्ष्मी चौक, भूमकर चौक यापरिसरात फिरते भाजी विक्रेते, फळ विक्रेते, चौकातील फ्लेक्स यावर मोठ्या प्रमाणात धडक कारवाई करण्यात आली होती. ही कारवाई करण्यात आल्याने विक्रेते, व्यावसायिक क्षेत्रीय कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोठ्या संख्येने उपस्थित राहून अतिक्रमण विरोधात मोठ्याने घोषणाबाजी करीत असल्याचे पहावयास मिळाले.
मला सकाळी फोन आल्याने सदर मी आणि विविध विभागातील अधिकारी अत्यंत तातडीच्या बैठकीसाठी गेलो होतो. मुख्य समन्वय अधिकारी यांना संपर्क केला होता. मात्र त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे ते का उपस्थित नव्हते हे मला सांगता येणार नाही. मुख्य प्रवेशद्वारावर आलेल्या मोर्चा प्रतिनिधींशी देखील अतिक्रमणबाबत सकारात्मक चर्चा केली आहे.
– अमित पंडित, ड क्षेत्रीय अधिकारीमाझी तब्बेत बरी नसल्या कारणाने मी वैद्यकीय रजा घेतली होती. माझे वैद्यकीय उपचार, तपासणी सध्याला सुरू आहे. त्यामुळे मी जनसंवाद सभेला उपस्थित राहू शकलो नाही.
– पंकज पाटील, उपायुक्त तथा मुख्य समन्वय अधिकारी
मला सोमवारी मुंबईमध्ये कोर्टाची तारीख असताना देखील जनसंवाद सभेला प्रथम गेलो. मात्र जनसंवाद सभेला क्षेत्रीय अधिकारी उपस्थित नसल्याने माझ्या तक्रारीचे योग्य निराकरण होऊ शकले नाही. त्यामुळे मी स्वतः नाराजी व्यक्त करीत सभेबाहेर पडलो.
– संजय झोंबाडे, पिंपळे गुरव
कुणाच्या परवानगीने जनसंवाद सभा असताना देखील क्षेत्रीय अधिकारी तसेच संबंधित अधिकारी तातडीच्या बैठकीला गेले. याचा खुलासा करण्यात यावा. योग्य खुलासा न केल्यास या अधिकाऱ्यांवर आयुक्तांकडून सक्त कारवाई करण्यात यावी.
– राजू सावळे, जुनी सांगवी





