पिंपरी : कामगारांच्या पगारासाठी आणलेली पाच लाखांची रोकड जळून खाक

पिंपरी-चिंचवड: शहरातील पिंपळे गुरव येथे बांधकाम मजुरांच्या झोपड्यांना गुरुवारी (दि. २३) सकाळी आग लागली. यामध्ये पाच झोपड्या जळून खाक झाल्या. बांधकाम मजुरांचे पगार करण्यासाठी आणलेली पाच लाखांची रोख रक्कम आणि कामगारांचे पाच तोळे सोन्याचे दागिने या आगीत जळाले.
पिंपळे गुरव मधील काशीद पार्क हा अतिशय दाट लोकवस्तीचा भाग आहे. याच परिसरात बांधकाम मजुरांनी झोपड्या बांधून आपला संसार थाटला आहे. मजुरांचे पगार करण्यासाठी ठेकेदाराने झोपड्यांमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीकडे पाच लाख रुपये दिले होते. ते पैसे लोखंडी ट्रंकमध्ये ठेवले होते. गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किट झाल्याने झोपड्यांमध्ये आग लागली. या आगीमध्ये पाच झोपड्या पूर्णपणे जळाल्या.
मजुरांनी एक एक पैसा जमवून बनवलेले सोन्याचे पाच तोळे दागिने या आगीत जळाले. तसेच लोखंडी ट्रंकमध्ये ठेवलेले पाच लाख रुपये देखील जळाले. सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि इतर साहित्य असे एकूण सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन विभागातून तीन आणि रहाटणी उपविभागाचे सब ऑफिसर गौतम इंगवले यांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाणी मारून आग विझवली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
घटनास्थळी पोहोचण्यास अडथळा
काशीद पार्क हा अतिशय दाट लोकवस्ती असलेला परिसर आहे. दोन्ही बाजूला मोठ्या इमारती, अरुंद रस्ता आणि अरुंद रस्त्यावर खासगी वाहनांची पार्किंग यामुळे अग्निशमन विभागाच्या वाहनांना घटनास्थळी पोहोचण्यास अडथळा आला. खासगी वाहने बाजूला करून रस्ता मोकळा करण्यात आला. त्यानंतर जवानांनी आग विझवण्याचे काम केले.





