Nashik – नाशिकमध्ये ठाकरेसेना आणि मनसेकडून शुक्रवारी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मनसेसह ठाकरेसेनेचे बडे नेते सहभागी झाले. यात मनसे नेते बाळा नांदगावकर, ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासह अन्य नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चात बाळा नांदगावकर हे संजय राऊतांच्या खांद्याला खांदा लावून सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. मोर्चात मनसैनिक आणि शिवसैनिकांनी हातात काळे झेंडे घेऊन सरकार विरोधात निषेध नोंदवला. वाढती गुन्हेगारी, अमली पदार्थांची विक्री, टोळ्यांची दहशत, सोनसाखळी चोरीच्या घटना, आश्वासने देऊन शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष, महानगरपालिकेतील भ्रष्टाचारी कारभार या प्रश्नांवरून महायुती सरकारच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी भ्रष्टाचार, गुन्हेगारी, कोयता गँग, जुगार, एमडी ड्रग्स अवैध धंदे असे विविध प्रात्यक्षिक कार्यकर्त्यांकडून मोर्चात सादर करण्यात आले. नाशिकनंतर असाच मोर्चा पुण्यात काढला जाणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. या मोर्चात नाशिककर देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सांगता सभा घेत ठाकरेसेना आणि मनसेच्या नेत्यांकडून सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला.