Jammu and Kashmir Election : अयोध्या, बद्रीनाथच्या पराभवानंतर मातेने तारले ! श्री वैष्णोदेवी मतदार संघात भाजपचा विजय

Jammu and Kashmir Election – जम्मू-काश्मीरमधील विधानसभेच्या ९० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राज्यातील श्री माता वैष्णोदेवी मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला आहे. भाजपचे उमेदवार बलदेव राज शर्मा यांनी ही जागा १९९५ मतांनी जिंकली आहे. या जागेवर अपक्ष उमेदवार जुगल किशोर दुसऱ्या क्रमांकावर राहिले.
तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे उमेदवार भूपेंद्र सिंह यांना ५६५५ मते मिळाली. जम्मू-काश्मीरमधील श्री माता वैष्णोदेवीची जागा भाजपसाठी खूप महत्त्वाची होती.
कारण लोकसभा निवडणुकीत 2024 मध्ये अयोध्या (फैजाबाद) आणि उत्तराखंडमधील बद्रीनाथ मतदारसंघ पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता. आता ही जागा भाजपने जिंकली आहे.
ही जागा जम्मू विभागातील रियासी जिल्ह्यात येते आणि या जागेवर 25 सप्टेंबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले होते. या जागेवर भाजपला सहज विजयाची अपेक्षा होती कारण ही जागा हिंदू सांस्कृतिक वारशाशी निगडीत आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान, राम मंदिर असलेल्या अयोध्येत भाजपला अशाच निकालांची अपेक्षा होती, परंतु फैजाबादची जागा समाजवादी पक्षाच्या अवधेश प्रसाद यांनी पराभूत केली.
जम्मू-काश्मीर निवडणुकीच्या निकालांबद्दल बोलायचे झाले तर जम्मू-काश्मीरमध्ये भाजप सरकार स्थापन करू शकणार नाही हे स्पष्ट झाले आहे आणि काँग्रेस राज्यात आघाडी सरकार स्थापन करू शकते हेही स्पष्ट आहे.





