Bribery case : जयपूर हेरिटेज महापालिकेच्या महापौर मुनेश गुर्जर निलंबीत

जयपूर :- राजस्थान सरकारने जयपूर हेरिटेज महापालिकेच्या महापौर मुनेश गुर्जर यांना निलंबीत केले आहे. त्यांच्या पतीला जमिनीचे करार जारी करण्याशी संबंधित लाचखोरीच्या प्रकरणात अटक केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था विभागाने शनिवारी रात्री उशिरा हा आदेश जारी केला. महापौरांचे पती सुशील गुर्जर आणि दोन मध्यस्थ नारायण सिंग आणि अनिल दुबे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रात्री दोन लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक केली होती.
नंतर, गुर्जरच्या घराची झडती घेतली असता 40 लाख रुपये रोख आणि लीजची फाइल जप्त करण्यात आली. तसेच नारायण सिंह यांच्या घरातून आठ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
निलंबनाच्या आदेशात, स्थानिक स्वराज्य विभागाचे संचालक आणि विशेष सचिव हृदेश कुमार शर्मा यांनी म्हटले आहे की, महापौरांचा या प्रकरणात प्रथमदर्शनी सहभाग असल्याचा संशय असल्याने चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांच्या पदावरून निलंबित करण्यात आले आहे.





