Rajasthan Election : ‘लोककल्याणकारी काम हाच आमचा दृष्टीकोन, काॅंग्रेस पुन्हा सरकार स्थापन करणार’ – सचिन पायलट

जयपूर/नवी दिल्ली – सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपसह प्रमुख राजकीय पक्षांच्या अनेक दिवसांच्या प्रचारानंतर आज, शनिवारी राजस्थानच्या 200 पैकी 199 जागांसाठी मतदान होत आहे. या दरम्यान काँग्रेसचे प्रमुख नेते आणि राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी जयपूरमधील मतदान केंद्रावर मतदान केले.
यानंतर एएनआयशी बोलताना त्यांनी आपल्या पक्षाला राज्यात आणखी एक संधी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी सरकार बदलण्याचा जनतेचा मूड नसल्याचे ते म्हणाले.
सचिन पायलट म्हणाले, मला विश्वास आहे की, राज्यात काँग्रेसला सत्तेत परतण्याची आणखी एक संधी मिळेल. सरकार स्थापन करण्यासाठी आम्हाला आवश्यक संख्याबळ मिळेल. इथल्या लोकांना काम करण्यासाठी कटिबद्ध असलेल्यांना मतदान करायचे आहे.
मेरा वोट, मेरा योगदान
अपना कर्त्तव्य निभाते हुए मैंने आज मतदान किया है।मेरा सभी से निवेदन है कि मतदान अवश्य करें। pic.twitter.com/04ajRSnIKl
— Sachin Pilot (@SachinPilot) November 25, 2023
एएनआयला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “राजस्थानची जनता गेल्या 5 वर्षांच्या कार्यकाळाकडे पाहतील आणि त्यानंतर मूल्यांकन करतील आणि मतदान करतील. मात्र, त्यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी मतभेद असलेल्या प्रश्नाला फारसे महत्त्व दिले नाही. ते म्हणाले, आम्ही पक्षासाठी एकत्र काम केले आहे. राजस्थानची काँग्रेस युनिट एकजूट आहे.
पायलट पुढे म्हणाले की, मला आशा आहे की जनता चांगला निर्णय घेईल… मला वाटते की जनतेला काँग्रेस पक्षाने पुन्हा सरकार बनवायचे आहे. जनतेने मागील पाच वर्षांत हे पाहिले आहे की, काँग्रेस लोककल्याणकारी काम करत आहे. तोच आमच्या पक्षाचा दृष्टीकोन आहे.
सचिन पायलट हे राजस्थान निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या टोंकमधून भाजपचे अजित सिंह मेहता यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. 2018 मध्ये सचिन पायलट यांनी भाजपच्या युनूस खान यांचा 54,179 मतांनी पराभव केला होता.





