Ishan Kishan Fifty : सॅमसनचा पत्ता कट? इशानच्या तुफानी खेळीने वर्ल्ड कपचं गणित बदललं; नॉर्खियाला एकाच ओव्हरमध्ये धो-धो धुतलं
Ishan Kishan Fifty : इशानने पहिल्याच षटकापासून आक्रमक पवित्रा घेतला, त्याने पहिल्याच षटकात दोन षटकार खेचून आपला इरादा स्पष्ट केला.

Ishan Kishan fifty against South Africa warm up : टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सराव सामन्यात टीम इंडियाच्या इशान किशनने आपल्या फलंदाजीने वादळ निर्माण केले. सलामीला येत इशानने दक्षिण आफ्रिकेच्या जागतिक दर्जाच्या गोलंदाजीची पिसे काढत अवघ्या २० चेंडूंत ५३ धावा ठोकल्या. या खेळीमुळे त्याने वर्ल्ड कपच्या प्लेइंग इलेव्हन मधील आपला दावा अधिक भक्कम केला आहे. ज्यामुळे संजू सॅमसनची चिंता वाढली आहे.
केवळ बाउंड्रीतून ५० धावा; नॉर्खियाचा उडवला धुव्वा
या सामन्यात भारताने आपली सलामीची जोडी बदलून अभिषेक शर्मासोबत इशान किशनला संधी दिली. इशानने पहिल्याच षटकापासून आक्रमक पवित्रा घेतला, त्याने पहिल्याच षटकात दोन षटकार खेचून आपला इरादा स्पष्ट केला. यानंतर दुसऱ्या षटकात रबाडाला देखील एक अप्रतिम षटकार मारला.
इशान किशनने खरा समाचार घेतला तो वेगवान गोलंदाज नॉर्खियाचा. नॉर्खियाच्या एका षटकात त्याने ३ षटकार आणि १ चौकार ठोकत एकूण २२ धावा वसूल केल्या. विशेष म्हणजे, त्याने आपल्या ५३ धावांपैकी ५० धावा केवळ चौकार आणि षटकारांच्या (७ षटकार, २ चौकार) मदतीने पूर्ण केल्या.
Ishan’s reaction after that crazy shot 🫠#ishankishan pic.twitter.com/TggWQowjCk
— PK (@PK23032) February 4, 2026
इशान अर्धशतकानंतर ‘रिटायर्ड आउट’ –
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इशान किशनने फक्त २० चेंडूत ७ षटकारांसह ५३ धावा केल्या.
इशान किशनने सहाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर षटकार खेचत आपले अर्धशतक पूर्ण केले. तो ज्या लयीत होता, त्यावरून तो मोठी धावसंख्या उभारेल असे वाटत होते. मात्र, हा सराव सामना असल्याने इतर खेळाडूंना संधी देण्यासाठी टीम इंडियाने त्याला ‘रिटायर्ड आउट’ करत मैदानातून परत बोलावले. त्याच्या जागी दुखापतीतून सावरलेल्या तिलक वर्माला फलंदाजीची संधी देण्यात आली.
संजू सॅमसनसाठी धोक्याची घंटा?
इशान किशनच्या या झंझावाती खेळीमुळे यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनसाठी आता प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवणे कठीण झाले आहे. संजूला मिळालेल्या संधींचे तो सोने करू शकला नाही, तर दुसरीकडे इशानने सलामीवीर म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे. वर्ल्ड कपच्या मुख्य सामन्यांमध्ये आता अभिषेक शर्मा आणि इशान किशन ही जोडी सलामीला दिसण्याची दाट शक्यता आहे.





