#IPL2022 #MIvCSK : वर्माने मुंबईला सावरले, चेन्नईसमोर विजयासाठी 156 धावांचे आव्हान

मुंबई – कर्णधार रोहित शर्मासह प्रमुख फलंदाजांना आलेल्या अपयशानंतर तिलक वर्माने फटकावलेल्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेतील गुरुवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जसमोर विजयासाठी 156 धावा करण्याचे आव्हान ठेवले.
चेन्नईचा कर्णधार रवींद्र जडेजाने नाणेफेक जिंकत मुंबईला पहिल्यांदा फलंदाजी दिली. त्याचा हा निर्णय सार्थ ठरवताना मुकेश चौधरीने कर्णधार रोहित शर्मा, इशान किशन व डेवाल्ड ब्रावीस यांना तंबूचा रस्ता दाखवला व मुंबईची अवस्था 3 बाद 23 केली. त्याचवेळी सूर्यकुमार यादवने तिलक वर्माला साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो स्थिरावल्यावरही बेजबाबदार फटका मारून बाद झाला. त्याने 32 धावांची खेळी करताना 21 चेंडूत 3 चौकार व 1 षटकार फटकावला. त्यानंतर या सामन्यात संधी देण्यात आलेल्या ह्रतीक शोकीनने वर्माला साथ देत संघाचा डाव सावरला. मात्र, तो देखील अनावश्यक फटका मारून 3 चौकारांसह 25 धावा करून बाद झाला.
दरम्यान, वर्माने आपले अर्धशतक पूर्ण केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बुधवारी निवृत्ती जाहीर केलेल्या कॅरन पोलार्डलाही मोठी खेळी करता आली नाही. तो 14 धावांवर बाद झाला. यावेळी मुंबईचा संघ दीडशतकी धावांची तरी मजल मारणार का, असा प्रश्न निर्माण झाला. मात्र, वर्माला साथ देण्यासाठी जयदेव उनाडकट फलंदाजीला आला व त्याने 1 चौकार आणि 1 षटकार फटकावत नाबाद 19 धावा करत वर्माच्या साथीने मुंबईला दीडशे धावांच्या पुढे मजल मारून दिली.
वर्माने आपल्या नाबाद 51 धावांच्या खेळीत 43 चेंडूंचा सामना करताना 3 चौकार व 2 षटकार फटकावले. चेन्नईकडून मुकेश चौधरीने 3 गडी बाद केले. ड्वेन ब्राव्होने 2 बळी घेतले. मिचेल सॅंटनर व माहिला तिकीष्णा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. मुंबईचा डाव 20 षटकांत 7 बाद 155 धावांवर रोखला गेला.
संक्षिप्त धावफलक – मुंबई इंडियन्स – 20 षटकांत 7 बाद 155 धावा. (सूर्यकुमार यादव 32, ह्रतीक शोकीन 25, तिलक वर्मा नाबाद 51, जयदेव उनाडकट नाबाद 19, मुकेश चौधरी 3-19, ड्वेन ब्राव्हो 2-36, मिचेल सॅंटनर 1-16, माहिला तिकीष्णा 1-35).





