IPL 2024 Auction : आयपीएल 2024 च्या लिलावासाठी दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. हा लिलाव 19 डिसेंबर रोजी होणार आहे. या लिलावात सहभागी होणाऱ्या 1166 खेळाडूंच्या आधारभूत किमतीही (base price) ठरविण्यात आल्या आहेत. सर्वाधिक आधारभूत किंमत असलेली श्रेणी 2 कोटी रुपये आहे.
या आधारभूत किमतीत एकूण 25 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. या श्रेणीत भारताचे फक्त चार खेळाडू आहेत पण ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे खेळाडू भरपूर आहेत. या दोन देशांतील 7-7 खेळाडूंनी त्यांची मूळ किंमत 2-2 कोटी रुपये ठेवली आहे.
लिलावात base price 2 कोटी असलेल्या खेळाडूची नावे…
भारत : हर्षल पटेल, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केदार जाधव.
इंग्लंड : हॅरी ब्रूक, टॉम बॅंटन, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, आदिल रशीद, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स.
ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, शॉन अॅबॉट.
दक्षिण आफ्रिका : गेराल्ड कोएत्झी, रिले रुसो, रॅसी व्हॅन डर ड्युसेन.
न्यूझीलंड : लॉकी फर्ग्युसन.
श्रीलंका : अँजेलो मॅथ्यूज.
बांगलादेश : मुस्तफिजुर रहमान.
अफगाणिस्तान : मुजीब उर रहमान.
77 खेळाडूंचे चमकेल नशीब…
लिलावात सहभागी होणाऱ्या 1166 खेळाडूंपैकी जास्तीत जास्त 77 खेळाडूंचेच नशीब चमकेल. खरं तर, सर्व 10 फ्रँचायझींसाठी एकूण उपलब्ध स्लॉट फक्त 77 आहेत. यापैकी जास्तीत जास्त 30 स्लॉट विदेशी खेळाडूंसाठी उपलब्ध असतील. या 77 रिक्त स्लॉट्ससाठी फ्रँचायझींकडे एकूण 262.95 कोटी रुपये उपलब्ध आहेत. म्हणजे प्रति स्लॉट सरासरी 3.40 कोटी रुपये उपलब्ध आहेत. अशा स्थितीत या मिनी लिलावात काही फार मोठ्या बोली लावल्या जाऊ शकतात असे म्हणता येईल.
173 खेळाडूंना ठेवण्यात आले कायम….
पुढील आयपीएल लिलावासाठी 10 फ्रँचायझींनी एकूण 173 खेळाडूंना कायम ठेवले होते. यातील 50 खेळाडू परदेशी आहेत. या कायम ठेवलेल्या खेळाडूंवर एकूण 737.05 कोटी रुपये खर्च झाला आहे. आयपीएलच्या या हंगामासाठी 10 फ्रँचायझींकडे एकूण एक हजार कोटी रुपये आहेत.