IPL 2025 चा हंगाम सुरु होण्यापूर्वी ‘या’ सामन्याचे बदलले ठिकाण, सुरक्षेच्या कारणास्तव घेतला ‘हा’ निर्णय

IPL 2025 KKR vs LSG 6 April Match Shifted to Guwahati : आयपीएल २०२५ चा हंगाम सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. तत्पूर्वी बीसीसीआयने १९ मार्च रोजी मुंबईत सर्व १० फ्रँचायझींच्या कर्णधारांसोबत बैठक घेतली. आगामी हंगाम सुरू होण्यापूर्वीच वेळापत्रकात बदल झाल्याची बातमी समोर आली आहे, ज्यामध्ये ६ एप्रिल रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जाणारा केकेआर आणि एलएसजी यांच्यातील सामना सुरक्षेच्या कारणास्तव गुवाहाटी येथे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
६ एप्रिल रोजी रामनवमी असल्याने घेण्यात आला निर्णय –
केकेआर आणि एलएसजी यांच्यातील सामना ६ एप्रिल रोजी त्याच दिवशी खेळला जाईल, ज्या दिवशी देशात राम नवमी साजरी केली जाईल. हे लक्षात घेऊन कोलकाता पोलिसांनी बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांना स्पष्ट केले की सामन्यात सुरक्षा प्रदान करणे त्यांच्यासाठी कठीण जाईल.
पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या निवेदनात, सीएबीचे अध्यक्ष स्नेहाशिष गांगुली म्हणाले की, रामनवमीच्या दिवशी कोलकाता शहरात २०,००० हून अधिक मिरवणुका निघतील, त्यामुळे सामन्याच्या दिवशी पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरविली जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही बीसीसीआयलाही याबद्दल माहिती दिली आहे. आता हा सामना गुवाहाटीमध्ये होणार आहे.
हेही वाचा – Yuzvendra Chahal T Shirt : युजवेंद्र चहलने घटस्फोट घेतल्यानंतर धनश्रीला मारला टोमणा? VIDEO होतोय व्हायरल
अजिंक्य रहाणे करणार केकेआरचे नेतृत्व –
आयपीएलच्या गेल्या हंगामात केकेआर संघाने जबरदस्त कामगिरी केली होती, ज्यामध्ये त्यांनी जेतेपदही जिंकले होते. मेगा लिलावापूर्वी, केकेआरने कर्णधार श्रेयस अय्यरला कायम न ठेवण्याचा निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. त्यानंतर त्यांनी लिलावात अजिंक्य रहाणेला त्याच्या संघाचा भाग बनवले, जो आता आगामी हंगामात संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देखील स्वीकारेल. केकेआरचा हंगामातील पहिला सामना २२ मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळणार आहे.
हेही वाचा – IPL 2025 New Rules : BCCI ने आयपीएल कर्णधारांना दिला मोठा दिलासा, स्लो ओव्हर रेट नियमात केला ‘हा’ बदल
केकेआरची पहिल्या सामन्यासाठी संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सुनील नारायण, अजिंक्य रहाणे (कर्णधार), वेंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, हर्षित राणा, स्पेन्सर जॉन्सन, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती. इम्पॅक्ट प्लेयर: अंगकृष रघुवंशी, लवनीथ सिसोदिया.





