KKR Record : ईडन गार्डन्सवर केकेआरचा ऐतिहासिक ‘शतकी’ धमाका! आरसीबीनंतर अशी कामगिरी करणारा बनला देशातील दुसराच संघ
KKR Record : कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात केकेआरने मैदानात उतरताच एक मोठा महाविक्रम आपल्या नावावर केला.

KKR 100 Matches Eden Gardens Record : आयपीएल २०२६ च्या १९ व्या हंगामातील ६० व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि गुजरात टायटन्स (GT) हे संघ समोरासमोर आले. कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात केकेआरने मैदानात उतरताच एक मोठा महाविक्रम आपल्या नावावर केला आहे. आयपीएलच्या इतिहासात एकाच मैदानावर (वेन्यू) १०० सामने खेळण्याचा पराक्रम कोलकात्याने केला असून, आरसीबीनंतर असा पराक्रम करणारा तो दुसराच संघ ठरला आहे.
ईडन गार्डन्सवर सामन्यांचे ‘शतक’ –
कोलकाता नाईट रायडर्सचे होम ग्राउंड असलेल्या ईडन गार्डन्सवर गुजरातविरुद्धचा हा सामना केकेआरचा १०० वा मुकाबला होता. यापूर्वी केवळ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) या संघाने बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सर्वाधिक १०१ सामने खेळले आहेत. कोलकात्याने ईडन गार्डन्सवर खेळलेल्या १०० सामन्यांपैकी ५५ सामन्यांत विजय मिळवला आहे, तर ४२ सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे; दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. दरम्यान, एकाच मैदानावर सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम मुंबई इंडियन्सच्या नावावर आहे, ज्यांनी वानखेडे स्टेडियमवर ९८ पैकी ५८ सामने जिंकले आहेत.
२४७ धावा कुटत पंजाबचा मोडला रेकॉर्ड –
ইডেন মানেই নাইটসদের ঘর 💜🏟️ pic.twitter.com/98dSCQj1l7
— KolkataKnightRiders (@KKRiders) May 16, 2026
या ऐतिहासिक सामन्यात केकेआरच्या फलंदाजांनी प्रथण फलंदाजी करताना गुजरातच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. फिन ॲलन, अंगकृष रघुवंशी आणि कॅमेरून ग्रीन यांच्या वादळी फटकेबाजीच्या जोरावर केकेआरने २० षटकांत अवघ्या २ विकेट्स गमावून २४७ धावांचा डोंगर उभा केला. यासह त्यांनी आयपीएल इतिहासात गुजरात टायटन्सविरुद्ध सर्वोच्च धावसंख्या उभारण्याचा पंजाब किंग्सचा (२४३ धावा, २०२५) रेकॉर्ड मोडीत काढला. ही धावसंख्या केकेआरच्या आयपीएल इतिहासातील तिसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.
नरेनने पोलार्ड-डिव्हिलियर्सला टाकलं मागे –
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्या परदेशी खेळाडूंच्या यादीत सुनील नरेनने अव्वल स्थान पटकावताना मुंबई इंडियन्सचा माजी अष्टपैलू किरॉन पोलार्डला (१८९ सामने) मागे टाकले आहे. या यादीत आरसीबीचा एबी डिव्हिलियर्स ( १८४ सामने) तिसऱ्या, डेव्हिड वॉर्नर (१८४ सामने) चौथ्या आणि ड्वेन ब्राव्हो (१६१ सामने) पाचव्या स्थानावर आहे. कोलकाता नाईट रायडर्सला तीन वेळा आयपीएलचे जेतेपद मिळवून देण्यात नरेनचा वाटा मोठा राहिला आहे. नरेनने या २०० सामन्यांच्या प्रवासात १८२० धावा केल्या असून त्याच्या नावावर २०३ विकेट्स आहेत.





