Finn Allen Record : फिन ॲलनने षटकारांचा पाऊस पाडत रचला इतिहास! केकेआरसाठी ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू
Finn Allen Record : ईडन गार्डन्स मैदानावर गुजरात टायटन्सविरुद्ध खेळताना न्यूझीलंडच्या या सलामीवीराने गुजरातच्या गोलंदाजांची अक्षरशः पळता भुई थोडी केली.

Finn Allen set record for KKR IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या (IPL 2026) रणधुमाळीत कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) स्फोटक फलंदाज फिन ॲलनने आपल्या वादळी फलंदाजीने नवा इतिहास रचला आहे. शनिवारी ईडन गार्डन्स मैदानावर गुजरात टायटन्सविरुद्ध खेळताना न्यूझीलंडच्या या सलामीवीराने गुजरातच्या गोलंदाजांची अक्षरशः पळता भुई थोडी केली. ॲलनने अवघ्या ३५ चेंडूंमध्ये ९३ धावांची स्फोटक खेळी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
डेब्यू हंगामातच ‘सॉल्ट’चा रेकॉर्ड फस्त –
गुजरात टायटन्सविरुद्ध मैदानात उतरल्यापासूनच फिन ॲलनने आक्रमक पवित्रा घेतला होता. त्याच्या ९३ धावांच्या या झंझावाती खेळीत ४ चौकार आणि तब्बल १० उत्तुंग षटकारांचा समावेश होता. या १० षटकारांसह ॲलनने आयपीएल २०२६ च्या हंगामातील आपल्या एकूण छक्क्यांची संख्या २७ वर पोहोचवली आहे. या कामगिरीसह तो केकेआरसाठी आपल्या पदार्पणाच्या (डेब्यू) हंगामात सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज बनला आहे. यापूर्वी हा विक्रम फिल सॉल्टच्या नावावर होता, ज्याने २०२४ च्या हंगामात २४ षटकार ठोकले होते.
आता सनथ जयसूर्याचा मोठा विक्रम धोक्यात –
4×4, 10×6, 93 (35)
Sheer carnage from Finn Allen at the Eden Gardens 🔥pic.twitter.com/WL57TRU3Q8
— Cricbuzz (@cricbuzz) May 16, 2026
केकेआरचा रेकॉर्ड मोडल्यानंतर आता फिन ॲलनच्या निशाण्यावर आयपीएल इतिहासातील एक सर्वात जुना आणि मोठा विक्रम आहे. मुंबई इंडियन्सचा माजी स्फोटक फलंदाज सनथ जयसूर्याने २००८ मधील पहिल्यावहिल्या आयपीएल हंगामात ३१ षटकार ठोकले होते, जो एका पदार्पणाच्या हंगामातील सर्वोच्च विक्रम आहे. फिन ॲलन या ऐतिहासिक विक्रमापासून आता केवळ ५ षटकार दूर आहे. कोलकाताचे अजून दोन सामने शिल्लक असल्याने ॲलन हा १८ वर्षे जुना विक्रम मोडीत काढणार का, याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
केकेआरने उभारला २४७ धावांचा रेकॉर्ड –
आयपीएलचा २०२६ चा ६० व्या सामन्यात केकेआर जीटी आमनेसामने आहेत. ज्यामध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकून केकेआरला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. केकेआरच्या फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत गुजरात टायटन्सविरुद्ध २० षटकांत २ गडी गमावून २४७ धावांचा डोंगर उभा केला. केकेआरकडून फिन ॲलन, कॅमेरॉन ग्रीन आणि अंगक्रिश रघुवंशी यांनी स्फोटक फलंदाजी केली. ज्यामुळे केकेआरने हा धावांचा डोंगर उभारला.





