Indian Premier League 2024 : इंडियन प्रीमियर लीगचा 17वा सीझन सुरू होण्यापूर्वीच एक विक्रम रचला गेला होता. कारण मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला, ज्याला KKR ने 24.75 कोटी रुपयांना विकत घेतले. पण काही खेळाडू आयपीएल 2024 मध्ये त्यांच्या मूळ किमतीला म्हणजेच 20 लाखांना विकले गेल्यानंतरही चमकदार कामगिरी करत आहेत. चला तर मग जाणून घेऊया अशा खेळाडूंबद्दल, जे अत्यंत स्वस्तात विकल्यानंतरही चमकदार कामगिरी करत आहेत.
1. शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा – पंजाब किंग्ज
आशुतोष शर्माने आयपीएल 2024 मध्ये पंजाब किंग्जकडून पदार्पण केले आहे. 6-7व्या क्रमांकावर फलंदाजी करताना तो पंजाबसाठी फिनिशरची भूमिका बजावत आहे. त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध 28 चेंडूत 68 धावांची झंझावाती खेळी करत पंजाबला एकहाती विजयाच्या जवळ आणले, पण पराभवानंतरही तो पंजाबसाठी हिरो ठरला. अनेक सामन्यांमध्ये शशांक सिंगसोबतच्या त्याच्या जोडीने गोलंदाजांची चांगलीच कोंडी केली आहे. आशुतोष शर्माने ( Ashutosh Sharma ) आयपीएल 2024 स्पर्धेतील 33 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध 28 चेंडूत 61 धावांची खेळी केली होती. पंजाब किंग्ज संघाला कठीण काळात सांभाळून त्याने ही खेळी खेळली. पंजाबसाठी तो सामना जिंकू शकला नसला तरी त्याची फलंदाजी अतिशय उत्कृष्ट होती. या दोघांना एका हंगामात फक्त 20 लाख रुपये दिले जातात. एकीकडे आशुतोषने या मोसमात 159 धावा केल्या आहेत तर शशांक सिंगने 195 धावा केल्या आहेत.
2. अंगकृष्ण रघुवंशी आणि हर्षित राणा – केकेआर
अंडर-19 क्रिकेट विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू अंगकृश रघुवंशी होता. आपल्या आयपीएल पदार्पणाच्या सामन्यात 27 धावांमध्ये 54 धावांची इनिंग खेळल्याने अंगकृश प्रसिद्धीच्या झोतात आला. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्सला हर्षित राणाच्या रूपाने प्रतिभावान गोलंदाज मिळाला आहे. हर्षित 2022 पासून केकेआरशी संबंधित आहे, परंतु आयपीएल 2024 मध्ये तो संघासाठी मुख्य गोलंदाज म्हणून उदयास आला आहे आणि त्याने आतापर्यंत 6 सामन्यांमध्ये 9 विकेट घेतल्या आहेत.
3. मयंक यादव, आयुष बडोनी आणि यश ठाकूर – लखनौ सुपर जायंट्स
एलएसजीला चालू हंगामात 1 नाही, 2 नव्हे तर 3 युवा स्टार मिळाले आहेत. मयंक यादवने IPL 2024 मधील सर्वात वेगवान चेंडू टाकून क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली होती. त्याचवेळी, आयुष बडोनी संघाच्या मधल्या फळीतील फलंदाजी मजबूत करत आहे, ज्याने या हंगामात अनेक महत्त्वपूर्ण खेळी खेळल्या आहेत. त्यांच्याशिवाय, यश ठाकूरच्या गोलंदाजीतील वेगळेपण (वेरिएशन) फलंदाजांना सतत त्रास देत आहे, ज्याने आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत 8 बळी घेतले आहेत.
4. इतर संघांनाही मिळाले युवा स्टार
GT : गुजरात टायटन्सबद्दल सांगायचे तर, साई सुदर्शनने नंबर-3 फलंदाजाची भूमिका अतिशय चांगल्या प्रकारे साकारली आहे. चालू मोसमात त्याने 269 धावा केल्या आहेत.
SRH : हैरदाबाद (SRH) ने अलीकडेच युवा अष्टपैलू नितीश रेड्डी याला संधी दिली, ज्याने आपल्या दुसऱ्या सामन्यात सामना जिंकणारी कामगिरी केली. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात त्याने 37 धावा केल्या आणि 2 महत्त्वाचे बळीही घेतले.
DC : दिल्ली कॅपिटल्ससाठी अभिषेक पोरेलने खालच्या फळीतील फलंदाज म्हणून सुरुवात केली, परंतु आता तो 3-4 क्रमांकावर फलंदाजी करताना खूप धावा करत आहे.
MI : मुंबई इंडियन्सच्या आकाश मधवालच्या गोलंदाजीत वेग आहे आणि तो सातत्याने विकेटही घेत आहे. त्याने 5 सामन्यात 5 विकेट्स घेतल्या आहेत.
RR : राजस्थान रॉयल्सबद्दल बोलायचे झाले तर, 6 विकेट्स घेऊन आपल्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचणाऱ्या कुलदीप सेनला संघाने 3 संधी दिल्या आहेत.