IPL 2024 (RCB vs DC Match 62) : पाटीदारची दमदार अर्धशतकी खेळी, आरसीबीनं दिल्लीसमोर ठेवलं 188 धावांचे लक्ष्य…

IPL 2024 (RCB vs DC Match 62, Live Cricket Score) :- आज आयपीएल 2024 च्या 62 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होत आहे. हा सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. हा सामना रॉयल चॅलेंजर्ससाठी करो या मरो अशा स्थितीचा आहे. संघ हरला तर त्याचा प्रवास इथेच संपेल. मात्र, दिल्ली हरली तर त्याचा आणखी एक सामना बाकी आहे. मात्र, प्लेआॅफचा प्रवास त्याच्यासाठी खूप कठीण होणार आहे. या स्थितीत त्यांना इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 20 षटकांत 9 गडी गमावून 187 धावा केल्या आहेत. बेंगळुरूसाठी हा करो या मरो असा सामना आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी त्यांना दिल्लीला 187 पेक्षा कमी धावांवर रोखावेच लागेल. मात्र, लक्ष्याचा बचाव करणे चिन्नास्वामी मैदानावर सोपे नाही. बेंगळुरूसाठी, कॅमेरून ग्रीनने 24 चेंडूत नाबाद 32 धावा तर रजत पाटीदारने सर्वाधिक 52 धावांची तर विल जॅकने 41 धावांची खेळी केली.
Innings Break!
A solid 3️⃣rd wicket partnership help #RCB set a 🎯 of 1️⃣8️⃣8️⃣
With 2️⃣ crucial points up for grabs, which way is this one going? 🤔
Scorecard ▶️ https://t.co/AFDOfgLefa#TATAIPL | #RCBvDC pic.twitter.com/g24jQoXjKD
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2024
प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार फाफ डुप्लेसिस पुन्हा एकदा खराब फॉर्ममध्ये दिसला. सहा धावा करून तो मुकेश कुमारचा बळी ठरला. यानंतर इशांत शर्माच्या चेंडूवर विराटने काही मोठे शॉट्स खेळले, पण या अनुभवी भारतीय गोलंदाजाने विराटला यष्टिरक्षक अभिषेक पोरेलकडे झेलबाद करून बंगळुरूला दुसरा धक्का दिला. विराट 13 चेंडूत 1 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 27 धावा करून बाद झाला.
यानंतर विल जॅकने रजत पाटीदारसोबत तिसऱ्या विकेटसाठी 53 चेंडूत 88 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी रसिक दार सलामने मोडली. आयपीएल कारकिर्दीतील सातवे अर्धशतक आणि या मोसमातील पाचवे अर्धशतक झळकावल्यानंतर रजत बाद झाला. त्याने 32 चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 52 धावांची खेळी केली. तर, जॅकचे अर्धशतक हुकले. तो 29 चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 41 धावा करून बाद झाला.
महिपाल लोमरोर (13), दिनेश कार्तिक (0) आणि स्वप्नील सिंग (0) यांना विशेष काही करता आले नाही. करण शर्मा सहा धावा करून धावबाद झाला. त्याचवेळी डावाच्या शेवटच्या चेंडूवर सिराज धावबाद झाला. त्याला खातेही उघडता आले नाही. कॅमेरून ग्रीन 24 चेंडूत 1 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 32 धावा करून नाबाद राहिला.
15 षटकांनंतर आरसीबीची धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 138 धावा होती. आरसीबी 210 धावांपर्यंत सहज पोहोचेल असे वाटत होते, परंतु 18 व्या षटकात खलील अहमदने महिपाल लोमरोर आणि दिनेश कार्तिक यांची विकेट घेत बंगळुरूच्या मोठ्या धावसंख्येच्या आशा धुळीस मिळवल्या. मुकेश कुमारने शेवटच्या षटकात केवळ 8 धावा दिल्या, त्यामुळे आरसीबीला 9 विकेट गमावून 187 धावा करता आल्या. दिल्लीकडून खलील अहमद आणि रसीख दार यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर इशांत शर्मा, मुकेश कुमार आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
दिनेश कार्तिकच्या नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद
या सामन्यात कार्तिक आरसीबीसाठी 7 व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता, पण तो एकही धाव न काढता आपल्या डावाच्या दुसऱ्या चेंडूवर बाद झाला. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शून्य धावांवर बाद होण्याचा विक्रम दिनेश कार्तिकच्या नावावर जमा झाला आहे. कार्तिक त्याच्या कारकिर्दीत 18 वेळा शून्यावर बाद झाला असून या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ग्लेन मॅक्सवेल आहे, जो 17 वेळा एकही धाव न काढता बाद झाला आहे.





