IPL 2024 (RCB vs DC Match 62) : आरसीबी प्ले-ऑफच्या शर्यतीत कायम, दिल्लीचा 47 धावांनी केला पराभव…

IPL 2024 (RCB vs DC Match 62, Live Cricket Score) :- आज (रविवार,12 मे) आयपीएल 2024 च्या 62 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स आमने-सामने होते. हा सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना रॉयल चॅलेंजर्ससाठी करो या मरो अशा स्थितीचा होता. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा 47 धावांनी पराभव केला आहे.
बंगळुरूने 20 षटकांत नऊ गडी गमावून 187 धावा केल्या होत्या.प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ 19.1 षटकांत 140 धावांवर गारद झाला. ऋषभ पंतच्या जागी कर्णधार असलेल्या अक्षर पटेलने 39 चेंडूत 57 धावा केल्या.जेक फ्रेझर मॅकगर्क आठ चेंडूत 21 धावा करून धावबाद झाला. त्याच्या खेळीत त्याने दोन चौकार आणि दोन षटकार मारले तर होपने 23 चेंडूत 29 धावांची खेळी केली. बंगळुरू संघाकडून यश दयालने सर्वाधिक तीन बळी घेतले. तर लोकी फर्ग्युसनने दोन विकेट घेतल्या. स्वप्नील सिंग, मोहम्मद सिराज आणि कॅमेरून ग्रीन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
आरसीबीचा हा सलग पाचवा विजय ठरला. हा संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत आहे. 13 सामन्यांत सहा विजय आणि सात पराभवांसह त्यांचे 12 गुण आहेत. दिल्लीवरील विजयासह संघ पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. बेंगळुरूला शेवटचा सामना 18 मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध चिन्नास्वामी येथे खेळायचा आहे. या सामन्यावर दोन्ही संघांचे भवितव्य अवलंबून असेल. चेन्नई जिंकल्यास आरसीबी प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल. त्याचवेळी, बेंगळुरूने सामना जिंकल्यास त्यांंना चांगल्या फरकाने जिंकावे लागेल जेणेकरून नेट रन रेट चेन्नईपेक्षा चांगला होऊ शकेल. यानंतरही बंगळुरूला इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे.
तत्पूर्वी, नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 20 षटकांत 9 गडी गमावून 187 धावा केल्या होत्या. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार फाफ डुप्लेसिस पुन्हा एकदा खराब फॉर्ममध्ये दिसला. सहा धावा करून तो मुकेश कुमारचा बळी ठरला. यानंतर इशांत शर्माच्या चेंडूवर विराटने काही मोठे शॉट्स खेळले, पण या अनुभवी भारतीय गोलंदाजाने विराटला यष्टिरक्षक अभिषेक पोरेलकडे झेलबाद करून बंगळुरूला दुसरा धक्का दिला. विराट 13 चेंडूत 1 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 27 धावा करून बाद झाला.
यानंतर विल जॅकने रजत पाटीदारसोबत तिसऱ्या विकेटसाठी 53 चेंडूत 88 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी रसिक दार सलामने मोडली. आयपीएल कारकिर्दीतील सातवे अर्धशतक आणि या मोसमातील पाचवे अर्धशतक झळकावल्यानंतर रजत बाद झाला. त्याने 32 चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 52 धावांची खेळी केली. तर, जॅकचे अर्धशतक हुकले. तो 29 चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 41 धावा करून बाद झाला.
महिपाल लोमरोर (13), दिनेश कार्तिक (0) आणि स्वप्नील सिंग (0) यांना विशेष काही करता आले नाही. करण शर्मा सहा धावा करून धावबाद झाला. त्याचवेळी डावाच्या शेवटच्या चेंडूवर सिराज धावबाद झाला. त्याला खातेही उघडता आले नाही. कॅमेरून ग्रीन 24 चेंडूत 1 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 32 धावा करून नाबाद राहिला.
15 षटकांनंतर आरसीबीची धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 138 धावा होती. आरसीबी 210 धावांपर्यंत सहज पोहोचेल असे वाटत होते, परंतु 18 व्या षटकात खलील अहमदने महिपाल लोमरोर आणि दिनेश कार्तिक यांची विकेट घेत बंगळुरूच्या मोठ्या धावसंख्येच्या आशा धुळीस मिळवल्या. मुकेश कुमारने शेवटच्या षटकात केवळ 8 धावा दिल्या, त्यामुळे आरसीबीला 9 विकेट गमावून 187 धावा करता आल्या. दिल्लीकडून खलील अहमद आणि रसीख दार यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर इशांत शर्मा, मुकेश कुमार आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
कार्तिकच्या नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद…
या सामन्यात कार्तिक आरसीबीसाठी 7 व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता, पण तो एकही धाव न काढता आपल्या डावाच्या दुसऱ्या चेंडूवर बाद झाला. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शून्य धावांवर बाद होण्याचा विक्रम दिनेश कार्तिकच्या नावावर जमा झाला आहे. कार्तिक त्याच्या कारकिर्दीत 18 वेळा शून्यावर बाद झाला असून या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ग्लेन मॅक्सवेल आहे, जो 17 वेळा एकही धाव न काढता बाद झाला आहे.





