Glenn Maxwell : मॅक्सवेलने घेतला सूर्यासारखा थक्क करणारा झेल, हवेत उडी अन् विजयाचा थरार! पाहा VIDEO

Glenn Maxwell taking amazing catch video : डार्विन येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर 17 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने सीमारेषेवर पकडलेल्या एका अप्रतिम झेलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज रायन रिकेल्टनला बाद करण्यासाठी हा झेल पकडला. मॅक्सवेलला या सामन्यात फलंदाजीमध्ये विशेष योगदान देता आले नाही, परंतु त्याच्या गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाने त्याने सर्वांचे लक्ष वेधले.
मॅक्सवेलने शेवटच्या षटकात घेतला अविस्मरणीय झेल
ग्लेन मॅक्सवेलने हा झेल दक्षिण आफ्रिकेच्या डावातील शेवटच्या षटकात पकडला. त्यावेळी रायन रिकेल्टन 71 धावांवर शानदार फलंदाजी करत होता. षटकातील दुसऱ्या चेंडूवर रिकेल्टनने लाँग ऑनच्या दिशेने षटकार मारण्याचा प्रयत्न केला, पण तिथे उपस्थित मॅक्सवेलने त्याला यशस्वी होऊ दिले नाही. एका क्षणी असे वाटले की चेंडू सहज सीमारेषेच्या पलीकडे जाईल, परंतु मॅक्सवेलने हवेत उडी मारून चेंडू पकडला आणि तो सीमारेषेच्या आत ढकलला. त्यानंतर त्याचा पाय सीमारेषेच्या बाहेर पडला आणि पुन्हा आत येऊन चेंडू पकडून झेल पूर्ण केला. या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, आणि चाहते मॅक्सवेलचे कौतुक करत आहेत.
टिम डेव्हिडने साकारली वादळी खेळी –
GLENN MAXWELL DOES IT AGAIN 🤩 #AUSvSA pic.twitter.com/FQkfbqLzpB
— cricket.com.au (@cricketcomau) August 10, 2025
सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवात खराब झाली. 30 धावांवर त्यांचे पहिले तीन फलंदाज मिशेल मार्श, ट्रॅव्हिस हेड आणि जोश इंग्लिस स्वस्तात तंबूत परतले होते. त्यानंतर कॅमेरून ग्रीन आणि टिम डेव्हिड यांनी डाव सावरला. 75 धावांवर अर्धा ऑस्ट्रेलिया संघ बाद झाला होता. यानंतर टिम डेव्हिडने 52 चेंडूत 83 धावांची वादळी खेळी करत संघाला 178 धावांपर्यंत पोहोचवले. दक्षिण आफ्रिकेकडून 19 वर्षीय क्वेना मफाकाने 4 विकेट्स घेतल्या.
हेही वाचा – BCCI : विराट-रोहित २०२७ च्या वनडे विश्वचषकापर्यंत खेळणार का? बीसीसीआयने केले स्पष्ट
रेयान रिकेल्टनची अर्धशतकी खेळी ठरली व्यर्थ
179 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा संघ 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 161 धावाच करू शकला. सलामीवीर रायन रिकेल्टनने 71 धावांची शानदार खेळी केली, परंतु त्याच्याव्यतिरिक्त इतर दक्षिण आफ्रिकी फलंदाजांना विशेष योगदान देता आले नाही. रिकेल्टननंतर ट्रिस्टन स्टब्सने 27 चेंडूत 37 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूड आणि बेन ड्वार्शुइस यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या, तर मॅक्सवेलने एक विकेट्स घेतली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.





