Glenn Maxwell : ऑस्ट्रेलियाने टी-२० मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा उडवला धुव्वा! ग्लेन मॅक्सवेलने केला ऐतिहासिक पराक्रम

Glenn Maxwell equals David Warner record : ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत बाजी मारली. केअर्न्स येथील तिसरा आणि निर्णायक सामना 2 गडी राखून जिंकत मालिका 2-1 अशी आपल्या नावावर केली. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 173 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ग्लेन मॅक्सवेलच्या वादळी खेळीच्या जोरावर 19.5 षटकात दणदणीत विजय मिळवला. या खेळीसह मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियासाठी खास पराक्रम केला.
मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियासाठी केला खास पराक्रम –
या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने 36 चेंडूंमध्ये 8 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 62 धावांची खेळी साकारली. या खेळीच्या जोरावर त्यांने ऑस्ट्रेलियासाठी खास पराक्रम केला आहे. गेल्या काही काळापासून फलंदाजीतील खराब कामगिरीमुळे टीकेचा सामना करणाऱ्या मॅक्सवेलने या सामन्यातील नाबाद 62 धावांच्या खेळीने पुन्हा एकदा आपली मॅचविनर म्हणून ओळख सिद्ध केली.
मॅक्सवेलने वॉर्नरच्या विक्रमाशी केली बरोबरी –
𝗠𝗔𝗫imum belief! 🫡#GlennMaxwell #AUSvsSApic.twitter.com/T9SyCnEStT
— OneCricket (@OneCricketApp) August 16, 2025
या खेळीदरम्यान मॅक्सवेलने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विजयी सामन्यांमध्ये 2000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा ऑस्ट्रेलियाचा दुसरा फलंदाज होण्याचा मान मिळवला. यापूर्वी डेव्हिड वॉर्नरने विजयी सामन्यांमध्ये 2237 धावा केल्या आहेत.या सामन्यातील 62 धावांच्या विजयी खेळीसाठी ग्लेन मॅक्सवेलला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. यासह मॅक्सवेलने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक सामनावीर पुरस्कार मिळवण्याच्या बाबतीत डेव्हिड वॉर्नरशी बरोबरी केली. मॅक्सवेलचा हा 12 वा सामनावीर पुरस्कार आहे.
हेही वाचा – Irfan Pathan : ‘आम्हाला जणू मेल्यासारखं वाटतं होतं…’, इरफान पठाणने सांगितला टीम इंडियाचा सर्वात वाईट काळ
ऑस्ट्रेलियासाठी टी-20 आंतरराष्ट्रीयत सर्वाधिक सामनावीर पुरस्कार मिळवणारे खेळाडू:
- डेव्हिड वॉर्नर – 12
- ग्लेन मॅक्सवेल – 12
- शेन वॉटसन – 9
- ॲडम झॅम्पा – 8
- ॲरॉन फिंच – 8
मॅक्सवेलच्या या खेळीने ऑस्ट्रेलियाला मालिका जिंकण्यासह त्याच्या वैयक्तिक कामगिरीनेही चाहत्यांचे मन जिंकले.





