IPL 2024 (MI vs LSG Match 67) : राहुल-पुरनची वादळी अर्धशतके, लखनौचं मुबंईसमोर 215 धावांचं आव्हान

IPL 2024 (MI vs LSG Match 67) : आज आयपीएल 2024 चा 67 वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या लखनौ सुपर जायंट्सने निकोलस पूरन विस्फोटक खेळी, केएल राहुलचं शानदार अर्धशतक आणि बडोनीचा फिनीशिंग टच याच्या जोरावर 20 षटकांत 6 गडी गमावून 214 धावा केल्या.
Innings Break!#LSG set a 🎯 of 2️⃣1️⃣5️⃣ courtesy of a batting blitz 👏#MI chase on the other side ⏳
Scorecard ▶️ https://t.co/VuUaiv4G0l#TATAIPL | #MIvLSG pic.twitter.com/JsYhLEKFM4
— IndianPremierLeague (@IPL) May 17, 2024
लखनौची सुरुवात खूपच खराब झाली कारण देवदत्त पडिक्कल पहिल्याच षटकात गोल्डन डकचा बळी ठरला. त्यानंतर राहुल-स्टोइनिसच्या भागीदारीने वर्चस्व मिळवण्यास सुरुवात केली असताना सहाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर स्टॉइनिस 28 धावा काढून बाद झाला. पॉवरप्ले संपेपर्यंत एलएसजीची धावसंख्या 2 गडी गमावून 49 धावा होती. पुढच्या 4 षटकांत अत्यंत संथ फलंदाजी झाली, त्यामुळे संघाला 10 षटकांत 3 गडी बाद केवळ 69 धावाच करता आल्या. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या दीपक हुडाला केवळ 11 धावा करता आल्या.
पण इथून पुढे राहुल आणि विशेषतः निकोलस पूरनने हाती सुत्रे घेत गोलंदाजांची चांगलीच धुलाई करण्यास सुरुवात केली. चौकार आणि षटकारांचा पाऊस सुरू झाला, त्याच दरम्यान गोलंदाज अंशुल कंबोजने 13व्या षटकात 22 धावा दिल्या. 15व्या षटकात आलेला अर्जुन तेंडुलकर खराब फिटनेसमुळे 2 चेंडू टाकून ड्रेसिंग रूममध्ये परतला. नमन धीरने त्याच्या जागी उर्वरित चार चेंडू टाकले आणि या संपूर्ण षटकात 29 धावा झाल्या. अशाप्रकारे एलएसजीने 15 षटकात 159 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती.
त्यानंतरही धावांचा वेग कमी झाला नाही, मात्र 17व्या षटकात नुवान तुषाराने पूरणला बाद केले. पूरनने अवघ्या 29 चेंडूंत 5 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 75 धावांची खेळी केली. पुढच्याच चेंडूवर अर्शद खान गोल्डन डकचा बळी ठरला. त्यानंतर पुढच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पीयूष चावलाने केएल राहुलला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. राहुलने 41 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकाराच्या मदतीने 55 धावा केल्या. एका झटक्यात एलएसजीची फलंदाजी बॅकफूटवर आली होती. पण शेवटच्या षटकांमध्ये आयुष बडोनी आणि कृणाल पंड्या यांच्यातील 36 धावांच्या भागीदारीमुळे लखनौ सुपर जायंट्सने 214 धावांपर्यंत मजल मारली. बडोनीने 10 चेंडूत 22 आणि कृणालने 7 चेंडूत 12 धावांची खेळी केली. दोघेही नाबाद माघारी परतले. राहुल आणि पूरण या दोघांमध्ये 109 धावांची जोरदार भागीदारी झाली. या खेळीमुळे लखनौला शेवटच्या 10 षटकात 145 धावा करता आल्या.
मुंबईच्या गोलंदाजाबदल बोलायचे झाले तर मुंबईकडून नुवान तुषारा आणि पियुष चावलाने प्रत्येकी सर्वाधिक तीन-तीन बळी घेतले. तुषाराने 4 षटकात 28 तर चावलाने 4 षटकात 29 धावा दिल्या. इतर कोणत्याही गोलंदाजांना विकेट घेण्यात यश आले नाही. या सामन्यात मुंबईने अर्जुन तेंडुलकरला संधी दिली. त्याने 2.2 षटकात 22 धावा दिल्या. अर्जुन तेंडुलकर खराब फिटनेसमुळे गोलंदाजीदरम्यानच ड्रेसिंग रूममध्ये परतला होता.





