IPL 2024 (MI vs LSG Match 67) : प्ले-ऑफच्या आशा जिंवत ठेवण्यासाठी लखनौला विजय महत्त्वाचा, मुंबई इंडियन्स शेवट गोड करणार का?

IPL 2024 (MI vs LSG Match 67, Today 7.30 PM) : आयपीएल 2024 च्या 67 व्या सामन्यात, मुंबई इंडियन्स (MI) चा सामना मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे मैदानावर लखनौ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध होणार आहे. मुंबई हा प्ले-ऑफ शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ आहे. तर दुसरीकडे लखनौसाठी अजूनही एक छोटीशी आशा शिल्लक आहे, ज्यामध्ये त्यांना शेवटच्या सामन्यातील विजयावर तसेच इतर संघाच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल.
दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत पाच सामने झाले आहेत, ज्यामध्ये एलएसजीने चार सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमध्ये वानखेडेवर झालेल्या एकमेव सामन्यातही एलएसजी संघाने बाजी मारली होती. आयपीएल 2024 या मोसमात लखनौ विरुद्ध मुंबई यांच्यात अखेरचा सामना हा 30 एप्रिल रोजी झाला होता. लखनऊने या सामन्यात मुंबईवर 4 विकेट्सने विजय मिळवला होता.
आयपीएलच्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेले मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स दोघेही शेवटच्या सामन्यात विजय मिळवून स्पर्धेचा शेवट करण्याचा प्रयत्न करतील. मुंबई इंडियन्स बऱ्याच आधी प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत, तर लखनौ सुपर जायंट्सने शेवटचा सामना मोठ्या फरकाने जिंकला तरी त्यांची अंतिम चारमध्ये पोहोचण्याची शक्यता नगण्य आहे. तीन सामन्यांतील सलग पराभवांमुळे लखनौचे गुणही कमी झाले आणि धावगतीही खालावलेली आहे.
मुंबई इंडियन्स, ज्याने आतापर्यंत 13 सामन्यांपैकी फक्त चार जिंकले आहेत, शुक्रवारी जिंकल्यास दहा गुण मिळतील आणि शेवटच्या स्थानावर जाणे टाळता येईल. कोलकाताकडून 98 धावांनी पराभूत झाल्यानंतर त्यांना सनरायझर्स हैदराबादने 10 गडी राखून पराभूत केले तर त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सनं 19 धावांनी पराभव केला. सलग तीन पराभवानंतर 13 सामन्यातील 12 गुणांसह सातव्या क्रमांकावर असलेल्या लखनौचा निव्वळ रन रेट -0. 787 आहे.
दोन्ही संघात अनेक बदल होण्याची शक्यता…
क्रिकेट तज्ज्ञांच्या मते, एमआय विरुद्ध एलएसजी सामन्यासाठी दोन्ही संघांचे व्यवस्थापन त्यांच्या प्लेइंग 11 मध्ये बरेच मोठे बदल करताना दिसू शकते. जर मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा असेल तर, MI vs LSG मॅचसाठी मुंबई 3 आणि लखनौ 4 बदल करताना दिसू शकते.
क्रिकेट तज्ज्ञांच्या मते, लखनौविरुद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग 11 ची तयारी करताना, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या अशा खेळाडूंना वगळू शकतो ज्यांनी मागील सामन्यांमध्ये खराब कामगिरी केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, MI विरुद्ध LSG मॅचच्या प्लेइंग 11 मध्ये हार्दिक पांड्या हा टिम डेव्हिडच्या जागी डेवाल्ड ब्रेविस, अंशुल कंबोजच्या जागी अर्जुन तेंडुलकर आणि नुवान तुषाराच्या जागी जेराल्ड कोएत्झीला संधी देण्याचा विचार करू शकतो.
लखनौचा कर्णधार केएल राहुलसुध्दा काही काळापासून खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वगळण्याचा विचार करू शकतो. क्रिकेट तज्ज्ञांच्या मते, एमआय विरुद्ध एलएसजी सामन्यासाठी व्यवस्थापन प्लेईंग 11 मध्ये डी कॉकच्या जागी काईल मेयर्स, मार्कस स्टॉइनिसच्या जागी ॲस्टन टर्नर, रवी बिश्नोईच्या जागी अमित मिश्रा आणि दीपक हुडाच्या जागी प्रेरक मंकड यांना संधी देण्याचा विचार करू शकते.
बुमराह पर्पल कॅपच्या शर्यतीत…
हा आयपीएल हंगाम मुंबईचा फास्ट बॉलर बुमराहसाठी खूप चांगला राहिला आहे आणि तो या सामन्यातही चांगली कामगिरी करून पर्पल कॅप परत मिळवण्याचा प्रयत्न करेल. त्याने 13 सामन्यात 20 विकेट घेतल्या असून पर्पल कॅपच्या शर्यतीत तो दुसऱ्या क्रमाकांवर आहे. त्याची गोलंदाजी खेळणं लखनौच्या सर्व फलंदाजांना त्रासदायक जाते. त्याने मार्कस स्टॉइनिसला चार वेळा, निकोलस पूरन आणि केएल राहुलला प्रत्येकी दोनदा आणि दीपक हुडा आणि क्विंटन डी कॉक यांना प्रत्येकी एकदा बाद केले आहे. यापैकी एकही फलंदाज बुमराहविरुद्ध 125 च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी करू शकला नाही, तर बुमराहविरुद्ध तीन फलंदाजांचा स्ट्राइक रेट 100 पेक्षा कमी आहे.
रोहित शर्माच्या फॉर्मचे काय होणार? मुंबईसाठी अखेरचा सामना…
चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध शतक झळकावल्यानंतर रोहित सतत फ्लॉप होत आहे, जे टी-20 विश्वचषकापूर्वी भारतासाठी चांगले लक्षण नाही. विश्वचषकापूर्वी रोहित शर्माचा हा शेवटचा स्पर्धात्मक सामना असेल आणि तो फॉर्ममध्ये परतण्याची सर्वाना अपेक्षा असेल. लखनौच्या गोलंदाजांमध्ये, बिश्नोई, कृणाल पांड्या आणि नवीन-उल-हक यांच्या प्रत्येकी एक बळी वगळता, कोणत्याही गोलंदाजाला T20 मध्ये रोहितला बाद करता आलेले नाही, मात्र ,या सर्व गोलंदाजांविरुद्ध रोहितचा स्ट्राइक रेट चिंताजनक आहे. बऱ्याच तज्ञांचा असा विश्वास आहे की, एमआय जर्सीमधील त्यांचा यशस्वी कर्णधार रोहितचा हा शेवटचा सामना देखील असू शकतो, त्यामुळे रोहित निश्चितपणे छाप सोडू इच्छितो.
रवी बिश्नोई असेल एलएसजीचा मुख्य गोलंदाज
लेगस्पिनर बिश्नोईसाठी हा मोसम चांगला नसला आणि त्याने विश्वचषकाचे तिकीटही गमावले असले तरी या सामन्यात तो पुनरागमन करण्याची आशा बाळगू शकतो. एमआयच्या फलंदाजांविरुद्ध बिश्नोईचा टी-20 रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. त्याने एमआयचे सलामीवीर इशान किशन आणि रोहित शर्मा यांना अनुक्रमे चार आणि दोन वेळा बाद केले आहे, त्यापैकी दोघांनीही त्याच्याविरूध्द 110 च्या स्ट्राइक रेटने धावा करू शकलेले नाहीत. बिश्नोईने फॉर्मात असलेल्या सूर्यकुमार यादवलाही तीन T20 डावांत बाद केले आहे, तर सूर्यकुमार त्याच्याविरुद्ध केवळ 121.87 च्या स्ट्राइक रेटने धावा करू शकला आहे.
मार्कस स्टॉइनिस असेल एलएसजीसाठी ट्रम्प कार्ड
या आयपीएलमध्ये मार्कस स्टॉइनिसच्या फॉर्ममध्ये चढ-उतार राहिलेला आहे. काही सामन्यात त्याने चेंडूने तर काही सामन्यात बॅटने चांगली कामगिरी केली आहे. या सामन्यात तो या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करू शकतो. स्टॉइनिसने बुमराह वगळता प्रत्येक मुंबईच्या गोलंदाजाविरुद्ध किमान 121 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत, तर या कालावधीत तो फक्त एकदाच बाद झाला आहे. गोलंदाजीतही त्याने इशान आणि सूर्यकुमारला प्रत्येकी दोनदा आणि हार्दिक पांड्याला तीनदा बाद केले आहे, तर त्याच्याविरूध्द 129 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने कोणीही धावा करू शकलेलं नाही.





