IPL 2024 (DC vs LSG Match 64) : दिल्लीच्या विजयासह राजस्थान प्लेऑफमध्ये, रोमहर्षक सामन्यात लखनौचा 19 धावांनी केला पराभव…

IPL 2024 (DC vs LSG Match 64, Score Update) : आज (मंगळवार,14 मे) आयपीएल 2024 च्या 64 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स आमने-सामने होते. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. दिल्लीसाठी हा ‘करो या मरो’ चा सामना होता. अशा सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सचा 19 धावांनी पराभव केला आहे.
विजयासाठी 209 धावांचा पाठलाग करताना लखनौचा संघ 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 189 धावा करू शकला. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना एलएसजीच्या फलंदाजांना मोठी भागीदारी करता आली नाही. लखनौकडून निकोलस पुरनने सर्वाधिक धावा केल्या. पूरणने 27 चेंडूत 61 धावांची तुफानी खेळी करताना 6 चौकार आणि 4 षटकार ठोकले. आयपीएल 2024 मध्ये शतक झळकावणाऱ्या मार्कस स्टॉइनिसशिवाय कर्णधार केएल आणि इतर अनेक फलंदाज धावांच्या बाबतीत दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. त्याचवेळी अर्शद खानही 33 चेंडूत 58 धावा करून नाबाद राहिला,पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
दिल्ली कॅपिटल्सकडून इशांत शर्मा, मुकेश कुमार आणि कुलदीप यादव यांनीही चांगली गोलंदाजी केली. लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने 8 गोलंदाजांचा अनोखा प्रयोग केला. इशांत शर्मा, मुकेश कुमार आणि कुलदीप यादव हे तीनच गोलंदाज होते ज्यांनी आपापल्या स्पेलमधील 4 षटके पूर्ण केली. इशांतने सर्वाधिक 3 बळी घेतले, तर कुलदीप आणि मुकेश यांना प्रत्येकी एकच विकेट घेता आली. त्यांच्याशिवाय, खलील अहमद, अक्षर पटेल आणि ट्रिस्टन स्टब्स यांनीही चेडूंसह आश्चर्यकारक कामगिरी केली आणि प्रत्येकी एक विकेट घेतली.
या विजयासह दिल्लीचा संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत आहे. त्याचवेळी दिल्लीच्या विजयाचा फायदा राजस्थान रॉयल्सला झाला. राजस्थानचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. त्याचे 16 गुण आहेत. राजस्थान व्यतिरिक्त आणखी दोन संघांना 16 किंवा त्याहून अधिक गुण मिळू शकतात. राजस्थानचा अजून एक सामना बाकी आहे. त्याचवेळी चेन्नईचे 13 सामन्यांत 14 गुण आहेत आणि सनरायझर्स हैदराबादचे 12 सामन्यांत 14 गुण आहेत. याशिवाय अन्य कोणताही संघ 14 गुणांपेक्षा जास्त गुण मिळवू शकणार नाही.
लखनौचा संघ तांत्रिकदृष्ट्या अजूनही आयपीएलमध्ये आहे. तथापि, त्याचा एक सामना शिल्लक आहे आणि संघ केवळ 14 गुणांपर्यंतच पोहोचू शकतो. 13 सामन्यांत त्याचे 12 गुण आहेत. तर, दिल्लीने साखळी फेरीत आपली मोहीम संपवली. त्यांनी सात विजय आणि सात पराभवांसह 14 सामन्यांतून 14 गुणांसह आपली मोहीम पूर्ण केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 12 गुणांसह प्लेऑफच्या शर्यतीत आहे. त्याला 18 मे रोजी चेन्नई सुपर किंग्जचा सामना करावा लागणार आहे. हा सामना जिंकणारा संघ प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करू शकतो, कारण दोघांचा निव्वळ धावगती सकारात्मक आहे, तर दिल्ली आणि लखनौचा निव्वळ धावगती नकारात्मक आहे.
तत्पूर्वी, लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाने ट्रिस्टन स्टब्स आणि अभिषेक पोरेल यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 20 षटकांत 4 बाद 208 धावसंख्येपर्यंत मजल मारली.
Innings Break!
Delhi Capitals have set a 🎯 of 2️⃣0️⃣9️⃣ in their last game of the season 👏👏
An important #LSG chase next ⏳
Scorecard ▶️ https://t.co/qMrFfL9gTv#TATAIPL | #DCvLSG pic.twitter.com/xgSg3a3OIF
— IndianPremierLeague (@IPL) May 14, 2024
दिल्लीची सुरूवात चांगली झाली नाही. दिल्लीला पहिल्याच षटकात पहिला धक्का बसला. या स्पर्धेत शानदार फलंदाजी करणाऱ्या जेक फ्रेझर मॅकगर्कला आपले खातेही उघडता आले नाही. त्याला अर्शद खानने नवीन उल हकच्या हाती झेलबाद केले. त्यानंतर शाई होप आणि अभिषेक पोरेल यांनी फटकेबाजी केली आणि पॉवरप्ले संपेपर्यंत सहा षटकांत एक विकेट गमावून 73 धावा फलकावर लावल्या होत्या. दरम्यान, अभिषेक पोरेलने 21 चेंडूत आपल्या आयपीएल कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक झळकावले. त्यानंतर दिल्लीला दुसरा धक्का नवव्या षटकात 94 धावांवर बसला. शाई होप 27 चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 38 धावा करून बाद झाला. त्याने अभिषेक पोरेलसोबत दुसऱ्या विकेटसाठी 49 चेंडूत 92 धावांची भागीदारी केली. होपला केएल राहुलच्या हाती रवी बिश्नोईने झेलबाद केले.
अर्धशतक केल्यानंतर लगेचच पोरेलही माघारी परतला. दिल्लीला तिसरा धक्का 12व्या षटकात 111 धावांवर पोरेलच्या रूपाने बसला. अभिषेक पोरेल 33 चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 58 धावा करून बाद झाला. त्याला नवीन उल हकने निकोलस पूरनच्या हाती झेलबाद केले. त्यानंतर सतराव्या षटकात दिल्लीला 158 धावसंख्येवर चौथा आणि मोठा धक्का कर्णधार पंतच्या रूपानं बसला. नवीन उल हकने कर्णधार ऋषभ पंतला दीपक हुड्डाकरवी झेलबाद केले. पंत 23 चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने 33 धावा करून बाद झाला.
पंत बाद झाल्यानंतर ट्रिस्टन स्टब्स आणि अक्षर पटेल यांनी दमदार फटकेबाजी करताना संघाची धावसंख्या 208 धावांपर्यंत नेली. पटेल आणि स्टब्स दोघेही नाबाद माघारी परतले. स्टब्स 25 चेंडूत 3 चौकार अन् 4 षटकाराच्या मदतीने नाबाद 57 तर पटेलने 10 चेंडूत 2 चौकारासह 14 धावांची नाबाद खेळी केली.
लखनौच्या गोलंदाजीबदल बोलायचे झाले तर नवीन उल हक याने सर्वाधिक 2 बळी घेतले. मात्र त्यासाठी त्याने 4 षटकात 51 धावा खर्च केल्या. त्यापाठोपाठ रवि बिश्नोई आणि अर्शद खान यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. बिश्नोईने 4 षटकात 26 तर अर्शदने 3 षटकात 45 धावा दिल्या.





