National Flag Insult : खळबळजनक! भरचौकात राष्ट्रध्वज पेटवला; दिल्लीच्या तरुणाला बेड्या…नक्की काय घडलं?
National Flag Insult : चाकणमध्ये तिरंगा जाळून कचऱ्यात फेकणाऱ्याला पोलिसांनी केली अटक, ठाकरवस्ती चौकातील धक्कादायक घटना.

National Flag Insult – भारताचा राष्ट्रध्वज जाळल्याप्रकरणी दक्षिण चाकण पोलिसांनी दिल्ली येथील एका तरुणाला अटक केली आहे. तरुणाने राष्ट्र्ध्वज अर्धवट जाळून तो कचऱ्यात फेकला. ही घटना १६ एप्रिल रोजी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास ठाकरवस्ती चौक, चाकण येथे घडली. असिफ शेख (वय २९, रा. चाकण. मूळ रा. दिल्ली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
त्याच्या विरोधात बीएनएस कलम १९६, राष्ट्रीय सन्मान प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रजनीश सीताराम राजभर (वय ३१, रा. नाणेकरवाडी, ता. खेड, जि. पुणे) यांनी दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजभर यांचे चाकण मधील ठाकरवस्ती परिसरात भाजी विक्रीचे दुकान आहे. त्यांच्या दुकानाच्या जवळ चिकनच्या दुकानात आरोपी असिफ हा एक वर्षापूर्वी काम करत होता.
दरम्यान त्याने काम सोडले होते. १६ एप्रिल रोजी तो दारूच्या नशेत राजभर यांच्या दुकानाजवळ आला. त्याने सोबत भारताचा राष्ट्रीय ध्वज आणला होता. त्याने राष्ट्रध्वज जाळला. अर्धवट जळालेला राष्ट्रध्वज पायाने विझवून तो कचऱ्याच्या डब्यात टाकला. हा प्रकार राजभर यांनी पाहिला. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी आरोपी असिफ याला अटक केली आहे. दक्षिण चाकण पोलीस तपास करीत आहेत.





