India Inflation Rate Rises: युद्धामुळे मार्चमध्ये महागाईच्या दरात झाली वाढ; किरकोळ महागाईचा दर वाढून 3.4 टक्क्यांवर
India Inflation Rate Rises: सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मार्च महिन्यामध्ये अन्नधान्याची महागाई 3.87% वाढले आहे. जर महागाई 4% च्या पुढे प्रदीर्घ काळ राहिली तर रिझर्व्ह बँकेला व्याजदर वाढीच्या शक्यतेवर विचार करावा लागू शकतो.

India Inflation Rate Rises: मार्च महिन्यात खनिज तेलाच्या किमती 100 डॉलर पेक्षा जास्त होत्या. त्याचबरोबर उन्हाळ्यामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली. या कारणामुळे मार्च महिन्यातील किरकोळ किमतीवर आधारित महागाईचा दर वाढून 3.4% इतका झाला आहे.
फेब्रुवारीत हा दर 3.21% होता. अजूनही रिझर्व्ह बँकेने ठरविलेल्या 4% उद्दिष्टापेक्षा महागाईचा दर कमी आहे. मात्र खनिज तेलाच्या किमती वाढल्यानंतर केंद्र सरकारने आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली नसली तरी आगामी काळात ही दरवाढ अटळ आहे. तशा अवस्थेत या महागाईचा दर 4% पेक्षा पुढे जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
तसे झाले तर रिझर्व्ह बँकेला महागाई कमी करण्यासाठी व्याजदर वाढीच्या शक्यतेवर विचार करावा लागू शकतो. महागाई अजूनही कमी पातळीवर आहे ही बाब ध्यानात घेऊन रिझर्व्ह बँकेने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केलेल्या पतधोरणात व्याजदर जैसे थे पातळीवर ठेवले आहेत.
दरम्यानच्या काळामध्ये इराण आणि अमेरिकेदरम्यानची चर्चा अयशस्वी झाली आहे. अमेरिकेने आखातातील खाडीची नाकेबंदी करण्याचे धोरण जाहीर केले आहे. अशा परिस्थितीत खनिज तेलाचे दर सोमवारी वाढवून 102 डॉलरच्या जवळपास गेले. हा पेच प्रसंग लवकर संपुष्टात येण्याची शक्यता मंदावली आहे.
अशा परिस्थितीत भारताला इंधन महागात पडणार आहे. भारत आपल्या गरजेच्या 85 टक्के इंधन आयात करीत असल्यामुळे महाग इंधनाचा महागाईवर तात्काळ प्रभाव दिसून येतो. यामुळे यावर्षी विकासदरही काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता अगोदरच व्यक्त करण्यात आली आहे.
सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मार्च महिन्यामध्ये अन्नधान्याची महागाई 3.87% वाढले आहे. जर महागाई 4% च्या पुढे प्रदीर्घ काळ राहिली तर रिझर्व्ह बँकेला व्याजदर वाढीच्या शक्यतेवर विचार करावा लागू शकतो. एकूणच इंधन महाग झाल्यानंतर त्याचा भारतीय स्थूल अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम शक्य असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.




