नवी दिल्ली – केंद्र सरकारने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबर महिन्यातील किरकोळ महागाई निर्देशांक घसरून केवळ 1.54% इतका नोंदला गेला आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये या महागाईचा दर 2.07% इतका होता. भाजीपाला, खाद्यान्न, डाळी इत्यादी स्वस्त झाल्यावर किरकोळ महागाई पूर्णतः आटोक्यात आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. महागाई कमी पातळीवर असूनही एप्रिल ऑक्टोबरच्या सुरुवातीस रिझर्व बँकेने व्याजदर कपात केली नव्हती. कारण जागतिक परिस्थिती अनिश्चित होती. मात्र महागाई पुढील महिन्यात याच पातळीवर राहिली तर पुढील पतधोरणावेळी रिझर्व बँक व्याजदर कपातीच्या शक्यतेवर विचार करू शकेल असे गृहीत धरले जात आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये किरकोळ महागाईचा दर तब्बल 5.39% इतका होता. मात्र त्यानंतर महागाई एकतर्फी वेगाने कमी होत आहे. राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने यासंदर्भात सांगितले की, भाजीपाला, खाद्यतेल, फळे, डाळी, खाद्यांन्न, अंडी, इंधन इत्यादी वस्तूच्या किमती वेगाने कमी होत असल्यामुळे किरकोळ महागाई कमी झाली आहे. महागाई पूर्ण वर्षभर कमी राहण्याचा अंदाज रिझर्व बँकेला आलेला आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या पतधोरणावेळी रिझर्व बँकेने चालू आर्थिक वर्षात महागाईचा अंदाज कमी करून 2.6% इतका केला आहे. अगोदर हा अंदाज 3.1% या पातळीवर ठेवण्यात आला होता. आगामी सहा महिन्यात महागाई कमी पातळीवर राहणार असल्याचे रिझर्व बँकेने म्हटले आहे. कारण पूर्ण देशात पाऊस चांगला पडला आहे. खरिपातील पिकावर काही प्रमाणात परिणाम झाला असला तरी एकूण उत्पादन जास्त पातळीवर राहण्याची शक्यता आहे. रब्बीचे चांगले पीक हाती येण्याची शक्यता आहे. कारण देशभरातील जलाशयामध्ये पाण्याचा साठा उत्तम आहे. शिवाय केंद्र सरकारने राखीव धान्यसाठा वाढविलेला आहे. अशा परिस्थितीत महागाई वाढण्याची कसलीच शक्यता नाही.