Stock Market: जागतिक पातळीवर वाढलेल्या भू-राजकीय तणावाचे सावट आज भारतीय शेअर बाजारावर स्पष्टपणे दिसून आले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या नव्या धमकीमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. परिणामी, आठवड्याच्या पहिल्याच सत्रात सोमवारी (१३ एप्रिल) मुंबई शेअर बाजाराचा ‘सेन्सेक्स’ आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’ मोठ्या घसरणीसह बंद झाले. Stock Market सकाळच्या सत्रात मोठी पडझड झालेल्या बाजाराने खालच्या स्तरावरून सुमारे ११०० अंकांची रिकव्हरी केली, मात्र तरीही बाजार लाल चिन्हातच स्थिरावला. आज बीएसई सेन्सेक्स ७०२.६८ अंकांनी (०.९१%) घसरून ७६,८४७.५७ वर बंद. (दिवसाची नीचांकी पातळी: ७५,८६८), एनएसई निफ्टी २०७.९५ अंकांनी (०.८६%) घसरून २३,८४२.६५ वर बंद. (दिवसाची नीचांकी पातळी: २३,५५५) घसरणीची प्रमुख कारणे – (Stock Market) १. डोनाल्ड ट्रम्प यांची ‘स्ट्रॅटेजिक’ धमकी- इराणसोबतची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर मोठी घोषणा केली. अमेरिकन नौदल आता ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’ची नाकेबंदी करणार असून इराणला शुल्क देऊन प्रवास करणाऱ्या जहाजांवर कारवाई केली जाईल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. यामुळे मध्य-पूर्वेतील संघर्ष अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. २. कच्च्या तेलाचा भडका – पुरवठा विस्कळीत होण्याच्या भीतीने ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमतीने १०० डॉलर प्रति बॅरलचा टप्पा ओलांडला आहे. कच्च्या तेलातील ६.८४ टक्क्यांच्या या वाढीमुळे भारतीय रुपयावर दबाव वाढला असून महागाई वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ३. हेवीवेट शेअर्समध्ये विक्री – रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि मारुती सुझुकी यांसारख्या शेअर्समध्ये मोठी विक्री झाल्याने बाजाराला सावरणे कठीण झाले. क्षेत्रनिहाय हालचाली – बाजार कोसळलेला असतानाही डिफेन्स (संरक्षण) क्षेत्रातील शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी रस दाखवल्याने तिथे काही प्रमाणात खरेदी दिसून आली. मात्र, आशियाई बाजारातील घसरण (निक्केई, कोस्पी आणि चीनचे मार्केट) आणि अमेरिकन फ्युचर्समधील पडझडीमुळे एकूणच बाजाराची धारणा नकारात्मक राहिली. जागतिक बाजाराचा कल – जपान (Nikkei 225): ०.७१% घसरण. द. कोरिया (Kospi): ०.७५% घसरण. अमेरिका (S&P 500 Futures): ०.७८% घसरण. दरम्यान, इराण-अमेरिका यांच्यातील विसंवाद आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती जोपर्यंत शांत होत नाहीत, तोपर्यंत शेअर बाजारात अस्थिरता कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. Stock Market