Manchar : दिवाळीच्या फराळावर महागाईची संक्रांत
Manchar : दिवाळीच्या फराळासाठी चकली, करंजी, लाडू आणि इतर पदार्थ बनवताना तेल, बेसन, साखर व गुळाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे यंदा फराळाचा खर्च वाढण्याची शक्यता आहे.

मंचर : दिवाळीचा सण तोंडावर येऊन ठेपला असताना अन्नधान्य, कडधान्ये, डाळी, साखर आणि खाद्यतेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या घरखर्चाचे गणित बिघडले आहे. सणासुदीला फराळासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होत असतानाच वाढत्या किमतींमुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे.
हरभरा डाळ, बेसन, साखर, गूळ आणि सुके खोबरे यांसारख्या वस्तूंच्या किमतीत वाढ झाली असून, किरकोळ बाजारात काही वस्तूंचे दर प्रतिकिलो ३८० ते ४०० रुपयांपर्यंत पोहोचल्याचे चित्र आहे. विशेषतः खाद्यतेलाच्या किमतींनी ग्राहकांना अधिक त्रस्त केले आहे. खाद्यतेलाच्या दरात प्रतिलिटर १० ते १५ रुपयांची वाढ झाली असून, पंधरा लिटरच्या डब्यामागे ७० ते १५० रुपयांची अतिरिक्त रक्कम मोजावी लागत आहे.
दिवाळीच्या फराळासाठी चकली, करंजी, लाडू आणि इतर पदार्थ बनवताना तेल, बेसन, साखर व गुळाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे यंदा फराळाचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. आधीच वाढत्या महागाईमुळे त्रस्त असलेल्या कुटुंबांना सणाचा आनंद घेतानाही खर्चावर नियंत्रण ठेवावे लागत आहे. दिवाळीच्या काळात दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी बाजारभावांवर लक्ष ठेवावे, अशी अपेक्षा ग्राहकांकडून व्यक्त होत आहे.
घाऊक बाजारातील खरेदीचे दर वाढल्याने किरकोळ विक्रीच्या किमती वाढवाव्या लागत आहेत. खाद्यतेल, डाळी आणि साखरेच्या दरातील चढउतारांचा परिणाम विक्रीवरही होत आहे. ग्राहक गरजेपुरतीच खरेदी करत असून, बाजारातील मागणीवर दरवाढीचा परिणाम जाणवू लागला आहे.
– प्रवीण शिंदे, संपर्कप्रमुख, पुणे जिल्हा कंजूमर प्रॉडक्टस डिस्ट्रीब्यूटर असोसिएशन, .
दिवाळीत फराळासाठी लागणारे साहित्य खरेदी करताना यंदा जास्त पैसे मोजावे लागत आहेत. तेल, बेसन, साखर आणि गुळाचे दर वाढल्याने घरखर्चाचे नियोजन कोलमडले आहे. सण साजरा करायचा म्हटले तरी इतर खर्चांना कात्री लावावी लागत आहे.
सुषमा अभिमन्यू शिंदे, गृहिणी, मंचर.





