Jejuri : भंडाऱ्याच्या सोनेरी रंगात नटले आदियोगी
Jejuri : 'कैलाश वाद्यम्' म्हणजे आदियोगी शिवाचे निवासस्थान असलेल्या कैलाशावर वाजवले जाणारे संगीत. पवित्र वाद्यांच्या नादध्वनींद्वारे, ही प्राचीन संगीत परंपरा कैलाशाचे वातावरण पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न करते.

जवळार्जुन :जेजुरी येथील पवित्र श्री खंडोबा मंदिरात ‘ईशा’च्या स्वयंसेवकांनी ‘कैलाश वाद्यम्’ हे पवित्र संगीत अर्पण सादर केले. यावेळी भाविकांसमोर आदियोगी शिवाचे चैतन्य साकारण्यात आले. सादरीकरणासोबतच, हळदीच्या सोनेरी रंगात सजलेल्या आदियोगींची मिरवणूकही काढण्यात आली. यावेळी भक्तिमय वातावरण निर्माण झाले. तत्पूर्वी, पुण्याच्या श्री सोमेश्वर मंदिरातही ‘कैलाश वाद्यम्’ सादर करण्यात आले. तिथेही आदियोगींची भव्य मिरवणूक काढली.
‘कैलाश वाद्यम्’ म्हणजे आदियोगी शिवाचे निवासस्थान असलेल्या कैलाशावर वाजवले जाणारे संगीत. पवित्र वाद्यांच्या नादध्वनींद्वारे, ही प्राचीन संगीत परंपरा कैलाशाचे वातावरण पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न करते. ज्यामुळे जिथे हे सादरीकरण होते. तिथे उपस्थित लोकांना त्या दिव्य चैतन्याचा अनुभव घेण्याची संधी मिळते. पूर्णपणे भक्तीवर आधारित ‘कैलाश वाद्यम्’ साधकाला शिवतत्त्व किंवा ‘शिव अवस्था’ अनुभवण्यास मदत करण्याच्या उद्देशाने सादर केले जाते.
‘कैलाश वाद्यम्’ पहिल्यांदाच महाराष्ट्रात आले आहे. याची सुरुवात (दि.२८) ऑक्टोबर रोजी मुंबईतील श्री बाबुलनाथ मंदिरात झाली. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात हे सादरीकरण करण्यात आले. महाराष्ट्रातील प्रवासाची सांगता पुण्याच्या श्री सोमेश्वर मंदिरात आणि जेजुरीच्या श्री खंडोबा मंदिरात झालेल्या सादरीकरणाने झाली. कार्यक्रमाचा भाग म्हणून भाविकांना प्रसाद म्हणून पवित्र रुद्राक्ष, विभूतीही देण्यात आली. उपक्रमांच्या माध्यमातून, ‘कैलाश वाद्यम्’चा अनुभव महाराष्ट्रातील विविध शिवमंदिरांमधील भाविकांपर्यंत पोहोचवण्याचा ‘ईशा’चा मानस आहे.
भारतीय संस्कृतींचा सुंदर संगम- पानसे
श्री खंडोबा मंदिरातील सादरीकरणाबद्दल बोलताना, ‘श्री मार्तंड देव संस्थान’चे अध्यक्ष ॲड. विश्वास गोविंद पानसे म्हणाले, ईशाच्या ‘कैलाश वाद्यम्’ सादरीकरणाच्या माध्यमातून आम्हाला दक्षिण आणि पश्चिम भारतीय संस्कृतींचा एक अतिशय सुंदर संगम पाहायला मिळाला. ईशाच्या स्वयंसेवकांनी ज्या प्रकारे एकत्र येऊन हे ‘कैलाश वाद्यम्’ सादर केले, ते खरोखरच अत्यंत विलोभनीय होते.





