Purandar : टोमॅटो उत्पादक आर्थिक खाईत लोटला
Purandar : मात्र, या पटीत उत्पादन कमी प्रमाणात मिळत आहे. कांद्याला दर चांगला मिळत असल्याने अनेकांनी नव्याने कांदा लागवड केली आहे.

वाल्हे : यावर्षी समाधानकारक पाऊस पडला नसल्याने शेतकरीवर्गासमोर पाणीटंचाईचे संकट आहे.यातच अतोनात कष्टातून पिकलेल्या शेतातील मालाला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने शेतकरीवर्ग आर्थिक संकटात सापडत आहेत. मागील काही दिवसांपासून टोमॅटो पिकांला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने उत्पादक चिंताग्रस्त झाले आहेत. टोमॅटो फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी आर्थिक खाईत लोटला जात आहे. बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक तोटा झाला आहे.
टोमॅटो पिकांची लागवड करण्यासाठी, एका एकरात नांगरणी, बेड तयार करणे, ठिंबक सिंचन, रोपे लागवड, खते, औषधे तसेच माल परिपक्व होईपर्यंत अंदाजे एकरी एक लाखापेक्षा अधिक खर्च येतो. इतका खर्च करूनही सद्यःस्थितीत टोमॅटोला प्रति वीस किलोला फक्त १५० ते २०० रुपये बाजारभाव मिळत असल्याने टॉमेटो उत्पादक शेतकरीवर्ग आर्थिक संकटात सापडत आहेत. मागील वर्षी सर्वञ पाऊस समाधानकारक झाला होता. त्यामुळे मागील वर्षी तरकारी पिके मोठ्या प्रमाणावर घेतल्याने तरकारी पिकांला जास्त बाजारभाव मिळाला नाही. सद्यःस्थितीत कांद्याला चांगला दर मिळत आहे.
मात्र, या पटीत उत्पादन कमी प्रमाणात मिळत आहे. कांद्याला दर चांगला मिळत असल्याने अनेकांनी नव्याने कांदा लागवड केली आहे. मात्र, यावर्षी अल्प पर्जन्यमान झाल्याने यावर्षी दुष्काळाचे सावट गडद होत असून, कांद्याचेही नुकसान होईल, अशी भीती शेतकरीवर्ग व्यक्त करीत आहेत.
शेतमजूर टंचाई; आर्थिक भुर्दंड
जेजुरी औद्योगिक वसाहतींमध्ये अनेक महिला, पुरुष कामला जात आहेत.येथील औद्योगिक वसाहतीमध्ये महिला- पुरूषांना ५०० ते ७०० रूपया पर्यंत एका दिवसाचा पगार मिळत असल्याने, उन्हात काम करण्यापेक्षा, सावलीला व कमी कष्टाचे काम औद्योगिक वसाहतीमध्ये मिळत असल्याने शेतात काम करण्यास मजूरही मिळत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
यावर्षी अल्प पाऊस पडला होता. तरीही अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली होती. मात्र, सध्याचा बाजारभाव पाहता टोमॅटो बाजारात विक्रीला नेण्यापेक्षा तो फेकून देण्याची वेळ आमच्यावर आली आहे. पिकांसाठी केलेला खर्चसुद्धा वसूल होत नसल्याने शेतकरीवर्गावर आर्थिक संकट ओढावत आहे.
– तानाजी भुजबळ, शेतकरी वाल्हे





