Shirur : मलठणमधील तलावाची स्थळपाहणी करा
Shirur : सहा शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे धाव घेतली आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी मलठणच्या मंडळ अधिकाऱ्यांना तातडीने प्रत्यक्ष स्थळपाहणी करून अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश दिले आहेत.

शिरूर : मलठण (ता. शिरूर) येथील शासकीय पाझर तलावाला पाणीपुरवठा करणारा नैसर्गिक प्रवाह अडविल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. मातीचे बांध आणि प्लॅस्टिकचे आच्छादन करून पावसाचे पाणी अडविल्याने तलाव कोरडा पडल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
विहिरींची पाणीपातळी घटल्याने उभी पिके धोक्यात आली आहे. सहा शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे धाव घेतली आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी मलठणच्या मंडळ अधिकाऱ्यांना तातडीने प्रत्यक्ष स्थळपाहणी करून अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश दिले आहेत. त्यामुळे आता प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
१९७२-७३ मधील भीषण दुष्काळाच्या काळात शासनाच्या रोजगार हमी योजनेतून मलठण येथील गट क्रमांक ६५ व ८५ मध्ये पाझर तलाव उभारला होता. तलावामुळे परिसरातील विहिरींची पाणीपातळी टिकून राहण्यास मदत होत होती. अनेक शेतकऱ्यांची शेती जलस्रोतावर अवलंबून होती. मात्र, तलावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पश्चिमेकडील गट क्रमांक १०१ आणि लगतच्या वनक्षेत्रातून येणाऱ्या नैसर्गिक नाल्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण केल्याचा आरोप आहे. गट क्रमांक १०१ चे जमीनमालक विलास पालरेषा यांनी मातीचे मोठे बांध घालून तसेच प्लास्टिकचे आच्छादन करून पाणी अडविल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
बांध हटविण्याची मागणी
सचिन शिंदे, दत्तात्रय शिंदे, विनायक विदे, सुहास शिंदे, कृष्णराव शिंदे, सुभाष शिंदे यांनी तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. नैसर्गिक जलप्रवाह अडविणाऱ्या बांधांची चौकशी करावी, प्रत्यक्ष पंचनामा करावा, नियमबाह्य बांधकाम आढळल्यास ते हटवून पाण्याचा प्रवाह पूर्ववत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
तहसीलदारांचे आदेश; सर्कल पाहणी करणार
शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी मंडळ अधिकारी मलठण यांना तातडीने स्थळपाहणी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. पाहणीत नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडविला आहे का, बांधांची स्थिती काय आहे. पाझर तलावाला पाणी मिळण्यास अडथळा निर्माण झाला आहे का, याची तपासणी होणार आहे. मात्र, शेतकऱ्यांना केवळ पाहणीच्या आश्वासनाने दिलासा मिळणार की प्रत्यक्ष बांध हटवून पाण्याचा प्रवाह सुरू केला जाणार, हा खरा प्रश्न आहे.





